असंख्य आदिवासी समाज एकवटला
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबागमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभुषा, नृत्यांचे सादरीकरण करीत असंख्य आदिवासी समाज या निमित्ताने एकवटला. संपुर्ण शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासींच्या हक्काचे समर्थन व संरक्षण करण्याबरोबरच जागरुकता वाढविण्यासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. यंदाही अलिबागमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या रॅली सुरुवात करण्यात आली. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरु झाली. रॅलीसोबत खालू बाजे, ताशे, तसेच पारंपारिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी गीतांचेदेखील सादरीकरण करीत आदिवासी समाजाचे महत्व जनतेपर्यंत पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आले. ठिकरूळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका ते शेतकरी भवन अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज सहभागी झाला होता. एक वेगळा उत्साह या निमित्ताने प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून आला. तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. जणू काही उत्सवच साजरा होत असल्याचे दिसून आले.