आदिवासींनी जाहीर केलेला रस्ता रोको स्थगित

आदिवासी वाड्यांच्या रस्त्यासाठी वन विभाग सकारात्मक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासन करीत नाही. त्यामुळे आदिवासी संघटनेने 27 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र वन जमिनीवरील रस्त्यासाठी जमीन देण्याच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आदिवासी लोकांनी जाहीर केलेला रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

माथेरान डोंगर रांगेत असलेल्या 12 आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासनाने बनवावा यासाठी जैतु पारधी आणि गणेश पारधी हे आदिवासी कार्यकर्ते गेली 10वर्षे आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत दोन वेळा रस्ता रोको आणि दोन वेळा उपोषण करण्यात आले आहे. डोंगरपट्ट्यात आदिवासी ठाकूर समाज बांधव पिढ्यान्‌‍‍ पिढ्या राहत आहेत. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी वाड्यांना अजून सुद्धा रस्ता नाही.

12 वाड्यांच्या रस्त्यासाठी 19 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचवेळी जानेवारी महिन्यात रस्त्याचे कामाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. परंतु रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने मे महिन्यात नेरळ माथेरान घाट रस्ता रोखला होता. त्यामुळे माथेरानकडे जाणारी वाहतूक थांबली होती. रस्त्याच्या कामासाठी वन विभागाने कोणत्याही अडथळा विनाजमीन द्यावी आणि रस्त्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील आदिवासी संघटना यांनी रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रश्न वन विभाग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

12 वाड्यांच्या रस्त्यासाठी जमीन देण्याबाबत वन विभागाचा 3(2)चा प्रस्ताव वन विभागाकडून करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. कर्जत वनपरिक्षेत्र पश्चिम वन क्षेत्रपाल समीर खेडेकर यांनी आपल्या कार्यालयात संबंधित सर्व वन कर्मचारी आणि ग्रामपंचायत यांना बोलावून घेतले. 26 जुलै रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयात वन परिक्षेत्रचे अधिकारी समीर खेडेकर, वनपाल जितेंद्र चव्हाण, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे तसेच आंदोलन कर्ते जैतु पारधी यांसह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावेळी वनविभाग यांच्या या रस्त्याचे कामाचा प्रस्ताव तत्काळ अलिबाग येथील जिल्हा उपवन अधिकारी यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला.त्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय शासनाने घेईल असे आश्वासन तालुक्याचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी आदिवासी संघटनेला दिले आहे.

त्यामुळे आज 27 जुलै रोजी नेरळ माथेरान घाट परिसरात होणारे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पुढील काळात याबाबत ठोस अधिकृत निर्णय झाला नाही तर नऊ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहोत, असेही यावेळी मालू निरगुडे यांनी जाहीर केले आहे. यावेळी आदिवासी संघटनेचे आंदोलनकर्ते जैतु पारधी, गणेश पारधी, रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे, जिल्हा संघटनेचे खजिनदार दत्ता निरगुडा, जिल्हा संघटनेचे सदस्य सुनील पारधी व कार्यकर्ते बुधाजी निरगुडा उपस्थित होते.

Exit mobile version