| माणगाव | प्रतिनिधी |
शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे दरवर्षी शिक्षकांची नियुक्ती निश्चित केली जाते. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होते, त्या ठिकाणच्या अतिरिक्त शिक्षकांचे आवश्यकतेनुसार इतर शाळांमध्ये बदली करून समायोजन करण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयात समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत मराठी माध्यमातील 26 आणि उर्दू माध्यमातील 5 असे एकूण 31 शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. तसेच, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सन 2024 मध्ये सेमी-इंग्रजी माध्यमात नियुक्त झालेल्या 10 शिक्षणसेवकांना जिल्ह्यातील उर्दू शाळांवर नेमणूक देण्यात आली होती. या शिक्षकांना आता मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्याचा निर्णय सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी समायोजनाची गरज स्पष्ट करत, प्रक्रियेत कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली. शिक्षकांच्या सोयीनुसार योग्य शाळा देण्याची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी सभापती वैकुंठ पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे तसेच सदस्य अमित नाईक यांनी व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही समायोजन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय कवितके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी भूरे, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे तसेच विनोद जोशी यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समायोजन प्रक्रियेत अनेक शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळा मिळाल्याने त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाचे आभार मानले.
जिल्ह्यातील 31 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
