प्रशासन लागले कामाला; कृषीवलचा दणका


। अलिबाग । प्रतिनिधी ।

सुरई येथील डोंगरभागात दगड व मातीच्या भरावाने दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याची बाब दैनिक कृषीवलने बातमीच्या रुपात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या बातमीनंतर जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन कामाला लागले. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी माती व दगडाच्या भरावाची पाहणी करून तातडीने ते काढण्याचे निर्देश धनदांडग्यांना दिले.

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुरई गावालगत दत्त टेकडीलगत धनदांडग्यांनी मोठ-मोठे बंगले बांधले आहेत. विकास करीत असताना डोंगरावरील दगड मातीचा भराव कडेलाच करण्यात आला आहे. पावसाळा सुरु झाला आहे. या पावसात दगड-माती डोंगराच्या खाली येण्याची भिती आहे. त्यामुळे घरांसह नागरिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब दैनिक कृषीवलने शासनाच्या निदर्शनास आणून दिली. सुरईवर दरडीची टांगती तलवार या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. बोर्ली येथील मंडळ अधिकारी काकडे आणि तलाठी यांनी दत्त टेकडीच्या परिसराला भेट दिली. त्या ठिकाणी असलेली माती, व दगडाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी तेथील कामगार व सुपरवायझरशी संवाद साधत केलेला भराव तातडीने काढा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

Exit mobile version