पाली शहराची कोंडी सोडविण्यात प्रशासनाला अपयश

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीचे समस्या अधिकच वाढत आहे. पाली शहरात येणार्‍या लक्झरी बसेस, डंपर, किराणा मालाचे वाहतूक करणारे मोठे ट्रक यामुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्व नागरिकांना करावा लागत आहे. पाली येथील लव्हाटे चौक ते अथर्व हॉटेलपर्यंत लक्झरी बसेस, डंपर यांच्यामुळे वाहनाच्या लांब लांब रांगा लागत आहेत.
पाली शहर हे अष्टविनायक धार्मिक स्थळापैकी बल्लाळेश्‍वर हे गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. यामुळे दरदिवशी हजारो भक्तभाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पाली शहरात येतात. भक्तभाविकांच्या दररोज लक्झरी बसेस पालीत येतात. या बसेस मोठ्या असल्यामुळे पाली शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
सुधागड तालुक्यातील भार्जेवाडी येथे दगडी खाण आहे. या दगडी खाणीतून दगड, ग्रिट वाहतूक करणारे डंपर खोपोली व वाकणकडे जातात. खोपोली व वाकणकडे जाण्यासाठी पाली शहरातून या डंपरला जावे लागते. रात्रदिवस या डंपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे पाली शहरातील अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी सारखी होताना दिसून येते.
पाली सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेत अनेक दुकाने आहेत. यामुळे बाजारपेठेतील दुकानासाठी मालाचा पुरवठा करणारे मोठे ट्रक पाली शहरात येतात. हे मालाची वाहतूक करणारे ट्रक दुकानात बाहेरील रस्त्यावरच उभे केले जातात. एक साईट रस्त्याची अडवली जाते. यामुळे वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. हटालेश्‍वर चौक ते गांधी चौक यामधील रस्त्यावर नेहमीच आपल्याला मालवाहतूक करणार्‍या वाहनांमुळे सतत वाहतूक कोंडी झालेली दिसून येते.

पाली शहरातील वाहतूक कोंडीवरील प्रश्‍नावर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात आहे. या तिन्ही सरकारी यंत्रणेने पाली शहरातील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर ठोस मार्ग काढण्याची गरज आहे. पाली शहरातील वाहतूक कोंडीचा मार्ग हा नक्कीच सुटण्यासारखा आहे व केवळ शासकीय यंत्रणेतील उदासीनतेमुळे वर्षानुवर्ष हा प्रश्‍न तसाच पडून आहे.

संदीप सिलिमकर
अध्यक्ष सुधागड तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती

Exit mobile version