जिल्ह्याचा कारभार मलबार हिलवरुन

पालकमंत्र्यांची पहिलीच आढावा बैठक जिल्ह्याबाहेर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्रीपदावरुन राज्यात रामायण महाभारत घडले. ते पालकमंत्रीपद बंडखोर शिंदे गटाला मिळाल्यानंतर नव्या पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपली पहिलीच आढावा बैठक मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे घेतली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांना आपल्या फाईली सांभाळत मलबार हिल गाठावे लागल्याने नापसंती व्यक्त केली जात होती. ज्यांना पहिली आढावा बैठक देखील जिल्ह्यात घेता येऊ शकली नाही ते जिल्ह्याचे पालकत्व कसे सांभाळणार अशा संतप्त प्रतिक्रीया जिल्ह्यातून व्यक्त केल्या जात आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची समजुत काढली गेल्यावर पुन्हा पालकमंत्री पद अदिती तटकरे यांच्या हातात सोपविण्यात आल्याने बंडाचा झेंडा हाती घेतला होता. अडीच वर्षात सातत्याने कुरबूरी वाढत जात प्रत्येक वेळी पालकमंत्री हटावचा नारा त्रिकूटाने दिला. त्याचेच पर्यावसान तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बंडात झाले. या आमदारांनी बंडखोरी करीत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर टिका करताना त्रिकूट आमदारांपैकी काहींनी तटकरे या महिला असल्याने शिवरायांच्या राजधानी असलेल्या जिल्ह्यावर पालकमंत्री देणे चुकीचे असल्याचे तारे देखील तोडले. हे सारे जिल्ह्यातील पालकमंत्री मिळावा म्हणून आकाश पातळ एक करत होते. तेच बंडखोर सत्तेत आल्यानंतर मात्र पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात एकाही आमदाराला स्थान मिळाले नाहीच त्यामुळे पालकमंत्रीपदापासून देखील साहजिकच जिल्हा दुरच राहिला. त्यामुळे रत्नागिरीचे पालकमंत्री पद सोपविण्यात आलेल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याच हातात रायगडचा देखील कारभार सोपविण्यात आला.

ज्या पालकमंत्री पदावरुन इतके सारे राजकीय नाटय घडले त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळताच जिल्ह्याचा कारभार व्यवस्थित हाकतील अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा तसेच इतर नियोजित विकासकामांबाबतची आढावा बैठक थेट मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे उद्योगमंत्र्यांनी बोलावली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभागाच्या खाते प्रमुखांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याने आपल्या लवाजम्यासह सर्व फाईल-दप्तराचा बोजा सावरत मलबार हिल गाठावे लागले. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव आणि विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना सूचना करताना रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवावे. ही ध्येयपूर्ती साधताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्याही मताला महत्त्व द्यावे. अधिकार्‍यांनीही लोकोपयोगी नावीन्यपूर्ण कामे सुचवावीत असे सांगितले. टंचाईचे प्रस्ताव, नगरपालिका मिनी फायर ब्रिगेड व्हॅन, कारागृहांच्या सोयी सुविधा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी प्रक्रिया तात्काळ करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे, प्राथमिक शाळांनी त्यांच्या सोयीसुविधा व अडचणी, शाळांसाठी मॉडर्न लॅब ची निर्मिती, कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारणे, लंपी आजाराविषयी जनावरांचे आवश्यक लसीकरण तात्काळ पूर्ण करावे. सेवा पंधरवडा अंतर्गत शासनाने निर्देशित केलेल्या सेवा जास्तीत जास्त नागरिकांना द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे यांनी मंत्री महोदयांसमोर संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा सादर केला.

Exit mobile version