तळा तालुक्यात 55 ठिकाणी मतदान केंद्र
। तळा । वार्ताहर ।
राज्याच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तळा प्रशासन सज्ज झाले असून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तळा प्रशासनातर्फे तालुक्यातील 55 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावरील मतदान मशिनसह इतर साहित्य अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत सील करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून विविध पक्षाचे व अपक्ष मिळून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ज्यामध्ये महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे या दोघांमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे पहायला मिळत आहे.
तालुक्यात विधानसभेसाठी मतदान करणार्या नागरिकांची संख्या 37 हजार 615 एवढी असून यामध्ये पुरुष मतदार संख्या 18 हजार 651 तर स्त्री मतदार संख्या 18 हजार 964 एवढी आहे. तळा प्रशासनातर्फे दिव्यांगांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये दिव्यांगाना घरूनच मतदान, मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था, रॅम रेलिंग जाण्या-येण्याची वाहन व्यवस्था, तसेच दिव्यांगांना स्वयंसेवक, मदतनीस इत्यादी सोय करण्यात आली आहे. तालुक्यातील एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी करण्यात आली असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनदेखील तळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.