| पनवेल | वार्ताहर |
येत्या सोमवारी 13 मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे 12 हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह 175 पीएमपीएमल बसेस, 219 एसटी महामंडळाच्या बसेस, 105 मिनी बसेस, 25 ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाख 85 हजार 18 मतदार असून यामध्ये 13 लाख 49 हजार 184 पुरुष मतदार, 12 लाख 35 हजार 661 महिला मतदार आणि 173 तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात 33 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर 83 सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी 1 हजार 958 बॅलेट युनिट, 750 कंट्रोल युनिट आणि 788 व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 544 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 404 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये 339 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 500 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये 344 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 520 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 390 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 732 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 404 बॅलेट युनिट, 553 कंट्रोल युनिट आणि 592 व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी 45 वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 549 मतदान केंद्रे असून याठिकाणी 2 हजार 436 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये 400 मतदान केंद्रे असून याठिकाणी 1 हजार 776 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती दीपक सिंगला यांनी दिली.