प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांची माहिती
। माणगाव । प्रतिनिधी ।
नवीन व्हेरिएन्ट ओमायक्रॉन अधिक प्रभावशाली असून कमी वेळेत जास्त व्यक्तींना बाधित करण्याची क्षमता आहे. या कोव्हि 19 चा नवीन व्हेरिएन्ट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाला असल्याचे प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी सांगितले. त्या अनुषंगाने माणगाव उपविभागामध्ये सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची सूचना माणगाव उपविभागीय अधिकारी दिघावकर यांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत देण्यात आले. त्यावेळी माणगाव व तळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय माणगाव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकार व मुख्याधिकारी नगरपंचायत यांनी सदर विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड अनुरूप वर्तनचे पालन नागरिकांकडून होत आहे अगर कसे याची पडताळणी करून आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही श्रीमती दिघावकर यांनी बैठकीत दिल्या. तसेच माणगाव उपविभागामध्ये कातकरी समाजासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविणे कामी संबंधित सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे याकरिता संबंधित यंत्रणांनी माध्यमिक शाळांमध्ये तसेच महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात यावे. माणगाव उपविभागामध्ये पुनर्वसित गावामध्ये 1 ते 18 सोयीसुविधांबाबत संबंधित यंत्रणांनी पाठपुरावा करावा अशा सूचनाही बैठकीत देण्यात आलेल्या आहेत.







