| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या अगणित वाढत आहे. त्यातच याठिकाणी वाहनांच्या पार्किंगची संख्या जागेअभावी मर्यादित असल्याने नेरळ-माथेरान या घाटरस्त्यात सुट्ट्यांच्या हंगामात वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत सर्व माहिती शासन आणि प्रशासनाला ज्ञात असताना देखील अद्याप पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने नागरिक आणि पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या वर्षी जून महिन्यापासून दर शनिवार-रविवारी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या दिवसांत पार्किंगच्या मर्यादित जागेमुळे नाईलाजास्तव नेरळ-माथेरान घाटातच आपल्या किंमती गाड्या पार्क करून त्यांना आपल्या लवाजम्यासह चालत माथेरान गाठावे लागत आहे. तसेच, घाट रस्त्यात गाडी पार्क केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दोन दिवस आरामासाठी आणि येथील नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी येणाऱ्याना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पर्यटक याठिकाणी येत आहेत म्हणून माथेरानकरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, पर्यटाकांनाचा योग्या त्या सुविधा निर्माण केल्या नाहीत तर आगामी काळात माथेरानसाठी धोक्याची घंटा नाकारता येत नाही, असे येथील ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत. राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे हे स्थळ अद्यापही विकसनशील होऊ शकलेले नाही. केवळ मतांच्या राजकारणापायी माथेरानकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निदान पर्यटनमंत्र्यांनी तरी याठिकाणी लक्ष केंद्रित करून पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरान रोप वे प्रा.लि. कंपनीला माथेरानमध्ये रोपे वे साठी सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 2016 मध्येच परवानगी दिली आहे. परंतु, त्यांना आतापर्यंत निधी उभा करता आला नाही. जर ते हा प्रकल्प करण्यास असमर्थ असतील तर शासनाने हा प्रकल्प ताब्यात घ्यावा. पर्यटकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. परंतु, आज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अपुरे आहे. प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. परंतु, या कंपनीच्या प्रवर्तकांच्या दबावापुढे शासकीय अधिकारी काहीच करत नाहीत. ते रोप वे करत नाहीत आणि एमएमआरडीएच्या फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाला आक्षेप घेतात. या प्रवर्तकांकडून (कर्जत) भुतीवली मार्गे माथेरान रोप वे प्रकल्प शासनाने एमटीडीसी अथवा एमएमआरडीएच्या माध्यमातून पुर्ण करावा आणि माथेरानकरांचे व पर्यटकांचे हाल संपवावेत.
मनोज खेडकर,
माजी नगराध्यक्ष







