न्यू इअर सेलिब्रेशन पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर

। पनवेल । वार्ताहर ।
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणार्‍या पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. विनापरवाना पार्ट्या आयोजित करणार्‍यांबरोबरच कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या आयोजकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकार यांच्या सूचनेनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील विविध आस्थापनांवर न्यू इअर सेलिब्रेशनच्या धर्तीवर करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लसीकरण अपूर्ण असणे, मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर न राखणे, कोविड अनुरूप वर्तन न करणे आदी कोविडच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याबरोबरच पनवेल तालुक्यातील जिमखाना क्लब, नाईट क्लब, विवाह सोहळे, रेस्टॉरंट, हॉटेल्स, रिसॉर्ट, कॉटेज, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, कंपनी, धार्मिक स्थळे, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक स्थळे, खाजगी कार्यालये आदी आस्थापनांवर कोविडच्या अनुषंगाने प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. तसेच विनामास्क आढळणार्‍या नागरिकांवरही दंड आकारला जाणार आहे. या अनुषंगाने सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहर आणि परिसरातील हॉटेल्स, पब, फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक फार्म हाऊस आहेत. दर वीकेंडला फार्म हौऊसवर पार्ट्यांचे बेत रंगतात. त्यातच काही दिवसांवर न्यू इयर सेलिब्रेशन येणार असून नागरिकांनीही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ङ्गन्यू इअरफ ला होणार्‍या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहे. पार्टीच्या ठिकाणी जाऊन ही पथके धडक तपासणी करून बेकायदा प्रकार घडल्यास कारवाई करणार आहेत.

Exit mobile version