जलजीवनवर प्रशासनाची मनमानी

नेहुली ग्रामस्थ आक्रमक,जि.प.अधिकार्‍यांना घेराव
 ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता केले जातात कामे

। अलिबाग । प्रतिनिधी ।
टँकरमुक्त  रायगड बनविण्यासाठी रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन योजना सुरु केली आहे. मात्र अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता प्रशासन ठेकेदाराला हाताशी घेऊन काम करीत असल्याचा आरोप खंडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह अन्य सदस्यांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी  कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत असल्याचे व्यक्त केले जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी नेहुली ग्रामस्थांनी शिवतीर्थावर अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला.
नवीन पाण्याचे स्त्रोत शोधून तसेच जुन्या पाण्याच्या स्त्रोतांचा अधार घेत प्रत्येक घरात पाणी पोहचविण्यासाठी केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाईप टाकण्याचे कामही सुरु आहे.  अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत  खंडाळे- धोलपाडा,  नेहुली – संगम, सागाव – तळवली, पवेळे –  पवेळे आदीवासीवाडी,  रुळे – काळोशी या ठिकाणी पाईपलाईनची कामे सुरु आहेत. परंतु, याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी, सदस्यांना विश्‍वासात न घेता जिल्हा परिषद प्रशासन ठेकेदाराला हाताशी धरून ही कामे आपल्या मर्जीने करीत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या योजनेची माहिती ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह सदस्य व गावातील नागरिकांना समजावी यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पंचायत समितीच्या उपअभियंता यांना 14 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र देऊन बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली. परंतू आजपर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत पाईपलाईनचे काम करीत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता ठेकेदाराच्या मदतीने प्रशासन मनमानी कारभार करीत कामे करीत आहेत.
संतोष कनगुटकर
माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य
 खंडाळे ग्रुप ग्रामपंचायत

खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या पाईपलाईनच्या कामाबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी, व सदस्य अनभिज्ञ आहेत. ही योजना जलजीवन मार्फत राबविली जात असल्याचे समजले. मात्र या योजनेबाबत कोणतीही माहिती ठेकेदार व प्रशासनाकडून दिली नाही. या योजनेची माहिती गावातील प्रत्येक नागरिकांना मिळावी यासाठी बैठक घेण्याचे नियोजन केले. उपअभियंता यांना  गेल्या चार महिन्यापूर्वी पत्र दिले. परंतू त्याबाबत कोणतेही उत्तर त्यांच्याकडून मिळाले नाही.
 अशोक थळे – उपसरपंच
 खंडाळे ग्रामपंचायत

Exit mobile version