| पाली/वाघोशी | वार्ताहर |
राज्य शासनाच्या आदेशानुसार अनुदानित तुकड्यांमधील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही, असे असूनही खोपोलीतील जनता विद्यालयाच्या प्रशासनाकडून विकास निधीच्या नावाखाली बळजबरीने प्रवेश फी वसुली करण्यात येत आहे. असा गंभीर आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे.
या प्रकरणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरे यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये, अनुदानित तुकड्यातील मागासवर्गीय, अपंग व गरीब विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या घेतलेले अतिरिक्त शुल्क दोन दिवसांच्या आत परत केले जावे. अन्यथा, संघटनेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाचे नियम धाब्यावर बसवत विकास निधीच्या नावाखाली दरवर्षी अनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांकडून आर्थिक शोषण होत आहे, हे अत्यंत गंभीर आहे. या प्रकारामुळे स्थानिक शिक्षण विभाग, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, आता मुख्याध्यापक गोरे व विद्यालय प्रशासन या आरोपांवर कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







