जि.प.कर्मचार्यांची आता फेसरिडींग हजेरी; बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवतीर्थ…रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यालय. आता या प्रशासकीय कार्यालयात काम करणार्या कर्मचार्यांना नुसते आपला चेहरा दाखवूनच आता प्रवेश घेता येणार आहे. शासकीय कार्यालयात वेळेवर हजेरी न लावता कधीही ड्युटीवर हजर होणार्या कर्मचार्यांची हजेरी आता चेहर्यावरून होणार असल्याने कामचुकार बाबूंची हजेरी लागणार आहे. त्यासाठी आता बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यालयात कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कर्मचारी याच्या चेहर्याची ओळख झाल्यानंतर हजेरी लागली जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेने ही बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जि.प.कार्यालयात साधारण चारशे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याची ग्रामीण विकास यंत्रणा ही या कार्यालयातून राबवली जाते. कार्यालयात कर्मचारी, अधिकारी हे वेळेत हजर व्हावेत आणि नागरिकांच्या समस्या त्वरित सुटाव्यात यासाठी बायोमेट्रिक फेस रीडिंग हजेरी यंत्रणा कार्यन्वित केली आहे. यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेत अधिकारी, कर्मचारी याची माहिती टाकण्यात आली आहे.
पं.स.मध्येही अंमलबजाणवी
बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यान्वीत केल्यामुळे आता अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयात वेळेवर आणि स्वतः हजर असल्याचे समजणार आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजही लवकर होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समितीमध्येही ही यंत्रणा बसवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
अशी होणार हजेरी
बायोमेट्रिक मशीनसमोर कर्मचारी उभा राहिल्यानंतर त्वरित त्याच्या चेहर्याची ओळख झाली की हजेरी लागली जाते. त्यामुळे वेळेचीही बचत होत असून कार्यालयात तोच अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिल्याचेही कळते. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात बसविण्यात आलेल्या यंत्रणेने आता कर्मचारी वेळेत हजर राहण्यास मदत होणार आहे