संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब

। खेड । वृत्तसंस्था ।
सुमारे पाच महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका बाजारपेठेतील सर्वच घटकांना बसला असून घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच कामगार व व्यापारी यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेले पाच महिने सुरू असलेल्या संपामुळे मालवाहतुकीसाठी व्यापार्‍यांना अन्य वाहतूकदारांचा पर्याय नाईलाजास्तव स्वीकारावा लागला.
बाजारपेठेमध्ये व्यापारी किरकोळ व घाऊक अशा दोन प्रकारामध्ये विभागला जातो. स्थानिक पातळीवर घाऊक व्यापार करण्यासाठी व्यापार्‍यांना कोकणाबाहेरील वस्तू व शेतमाल उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातील कच्चा माल अथवा तयार वस्तू विक्रीसाठी ने-आण करताना राज्य परिवहन महामंडळाचे जाळे सोपे व किफायतशीर वाहतूक साधन व्यापार्‍यांसाठी ठरत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या बाजारपेठेमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापार्‍यांना खासगी मालवाहतुकीचा महागडा पर्याय स्वीकारताना अधिकचे नुकसान सोसावे लागत आहे. खायची पाने, फुले, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी दुग्धजन्य पदार्थ, वर्तमानपत्र स्थानिक पातळीपर्यंत एसटीने पोहचवण्यात येत होती. घाऊक व किरकोळ विक्रेते त्यांची विक्री करून आर्थाजन करत होते. परंतू, त्यांना मिळणार्‍या नफ्यामध्ये वाहतुकीचा खर्च वाढल्याने या व्यापार्‍यांचे आर्थिक घडी कोलमडली आहे. वृत्तपत्र व्यावसायिक विक्रेते ग्रामीण भागात बस फेर्‍या पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे केवळ शहर व उपनगरांमध्येच वृत्तपत्र विक्री करून आपला चरितार्थ चालवत आहेत.
कोकणात शेतीचे मर्यादित क्षेत्र आहे. त्यातही भाजीपाला लागवड करणारे शेतकरी संपूर्ण तालुक्यात अत्यल्प संख्येत आहेत. अशा शेतकर्‍यांना ग्रामीण भागातून स्थानिक पातळीवर उत्पादित होणारा भाजीपाला, फळभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येताना खासगी वाहनाने ये -जा करावयास लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दड सोसावा लागत आहे. हा सारा खर्च हा न परवडणाराच आहे. व्यापार्‍यांकडे अनेक लोक ग्रामीण भागातून नोकरीसाठी ये -जा करत होते. परंतु संपामुळे त्यांना ये -जा करण्यासाठी कमी खर्चाचे असलेले साधन बंद झाल्याने अल्पमजुरीत आपल्या कुटुंबांचा रहाटगाडा हाकावा लागत आहे.

Exit mobile version