निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आणि सदस्यपदाचा मंगळवारी (दि.10) राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह जनतेनेही नाराजी व्यक्त केली.
अॅड. आस्वाद पाटील हे शेकापच्या नेत्या, माजी राज्यमंत्री दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे सुपूत्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाने त्यांना विविध संधी उपलब्ध करुन दिल्या. लाल बावटा घेऊन त्यांनी पक्षाचे काम केले. पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन जिल्हा चिटणीस पदापासून अनेक पदे त्यांच्याकडे सोपविली. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम सभापती आदी पदे पक्षाने त्यांना दिली. मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. परंतु त्यांनी वैयक्तिक कारणासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला.
शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता कधीही आमिषाला बळी पडला नाही. हा इतिहास आहे. सत्ता नसतानाही पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही आपली तत्व, विचार सोडला नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुरोगामी विचार घेऊन कायम लाल बावटा टिकविण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळे शेतकरी, अन्यासग्रस्त, कष्टकर्यांच्या हितासाठी लढणार्या शेकापसोबत गद्दारी करणार्यांना जनता माफ करणार नसल्याची प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.