| अलिबाग | प्रतिनिधी |
लेक लाडकी अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये पत्रकार भवन मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ती, विधीज्ञ तसेच तेजस्विनी फाऊंडेशन रायगड संस्थापिका ॲड. जीविता सूरज पाटील यांना हजारोंच्या उपस्थितीत मराठी पत्रकार भवन मुंबई येथे महापौर मुंबई महानगरपालिका किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी समारंभ अध्यक्षा चारुशीला देशमुख, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सामाजिक व शैक्षणिक संस्था स्वागताध्यक्ष डॉ. मोनिका चोप्रा-जगताप, प्रमुख पाहुणे स्वाती घोसाळकर, स्वाती ओक तसेच लेक लाडकी अभियान संयोजक मुंबई सूरज भोईर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ती जीविता पाटील यांनी आयुष्यभर स्वावलंबी जीवन जगत असताना अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत असताना परिस्थितीशी तडजोड करून आपले शिक्षण पूर्ण केले. समाजातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदभार सांभाळले. महिलांविषयी असणाऱ्या शासकीय निमशासकीय कमिटी सदस्या, प्रमुख वक्ता, निवेदक, परीक्षक, मार्गदर्शक, पत्रकार इ. अनेक भूमिका पार पाडून आपला व मुलाचा उदरनिर्वाह करून समाजात आपला एक मानाचा ठसा उमटविला आहे. स्वतः खडतर परिस्थितीत शिक्षण घेवून आज त्या कित्येक महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत आहेत. त्यांनी स्वतः एम.ए. बी.एड, एम. ए.एज्युकेशन, एम.एस.डब्ल्यु, एल.एल.बी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून सध्या त्या एल.एल.एम. हे मास्टर डिग्री अभ्यासक्रम बी.सी.टी. कॉलेज ऑफ लॉ पनवेल येथे प्राचार्या सानवी देशमुख, सहाय्यक प्रोफेसर धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करीत आहेत.
आत्तापर्यंत त्यांनी 49 मुली दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. अलिबागमध्ये राहूनच एक सुसज्ज वृध्दाश्रम आणि महिलांसाठी रोजगार केंद्र स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या करीत असणाऱ्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे लेक लाडकी अभियान अंतर्गत भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार 2024 प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आत्तापर्यंत 1 राष्ट्रीय पुरस्कार, 2 महाराष्ट्र शासनाचे, 9 राज्यस्तरीय पुरस्कार तर जिल्हा व तालुका स्तरीय असे एकूण 169 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल अनेक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







