रौप्यमहोत्सवी वर्षात पटकावले दोन पुरस्कार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाचे तथा अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ कॉलेजला मानाच्या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या पुरस्कारांनी कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली असून, शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शुक्रवारी (दि. 25) बंगळुरु येथील कार्यक्रमात पद्मश्री डॉ.सी.आर. चंद्रशेखर व पद्मश्री डॉ. गोपालन शंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2 ऑगस्ट 2000 साली सुरू झालेले रायगड जिल्ह्यातील पहिले लॉ कॉलेज म्हणजेच अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ यावर्षी 25 वे वर्ष साजरे करत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात लॉ कॉलेजला NAAC च्या पहिल्या cycle मध्ये B ग्रेड तर मिळालीच; पण आज रोजी India Elite Education Institutional Excellence Awards Conference 2024, National Edition यांच्यातर्फे देण्यात येणारे Outstanding Trusted Law College of the Year 2024 Maharashtra Award under Quality Education, Excellent Administration Social Contribution Category for the year 2024. तसेच Excellence In Educational Standards Adaptability Implementation हे दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. सदरहू पुरस्कारांचे वितरण 25 ऑक्टोबर 2024 रोजी बंगळुरू येथील The Grand Ballroom, Taj West End या पंचतारांकीत हॉटेलमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
जनता शिक्षण मंडळाचे तथा अॅड दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील व लॉ कॉलेजच्या प्राचार्या अॅड. नीलम हजारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यानिमित्ताने अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विनाअनुदानित लॉ कॉलेज चालवणे मेहनतीचे व अडचणीचे काम असते. परंतु, एखाद्या कोचला जसा संघनायक हवा असतो, तसा प्राचार्य अॅड. नीलम हजारे यांच्या रूपाने मला मिळाला असून, टीममधील सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन मी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून त्यांनी आपण खरेखुरे टीम लीडर आहोत हे हा पुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लॉ कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी आनंदोत्सव साजरा केला. समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, वकील तसेच पालक यांनी कॉलेज व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.







