संविधानातील कलमांचा अर्थ विशद करा: न्यायमूर्ती अभय ओक

अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान

| अलिबाग | प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांनी लिगल एड सर्व्हिसेसच्या माध्यमातून समाजामध्ये कायदेविषयक जागरूकता करावी, तसेच विधीसेवक म्हणून समाजात कार्य करावे, असा सल्ला सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अभय ओक दिला. कायद्याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी संविधानातील कलमांचा अर्थ विशद करणे हे महत्त्वपूर्ण कार्य करताना सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज विधी व्यवसायामध्ये आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्या. ओक यांनी केले.

अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयामध्ये न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन शनिवारी (दि.24) करण्यात आले होते. यावेळी न्या. अभय ओक यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विधी महाविद्यालयांची आवश्यकता, विधी शिक्षणाचे महत्त्व, विधी व्यवसायाची नीतीमत्ता, विधी साक्षरता, विधी व्यवसायाच्या संधी याबाबत आपल्या विधी क्षेत्रातील अनुभवांच्या आधारे सखोल माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी लिगल एड सर्व्हिसेसच्या माध्यमातून समाजामध्ये कायदेविषयक जागरूकता करावी तसेच विधीसेवक म्हणून समाजात कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. कायद्याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी संविधानातील कलमांचा अर्थ विशद करणे, हे महत्त्वपूर्ण कार्य करताना सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज विधी व्यवसायामध्ये आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कोणताही खटल्याचा निकाल जाहीर करताना संविधानातील समानतेचा अधिकार, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जगण्याच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याविषयीचे महत्त्व त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना संविधानाचे भारतीय न्याय व्यवस्थेतील स्थान, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन भाषा कोणती असावी, न्यायालयिन प्रक्रियेमध्ये डिजिटलायजेशनचा वापर कितपत केला जातो, सर्वोच्च न्यायालयाने विकसित केलेले अ‍ॅप ‘सुहास’, एआय टेक्नॅालॅाजीचा योग्य वापर, न्यायालयांचे स्वातंत्र्य, समाज माध्यमांचा न्यायव्यवस्थेवर सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाचा होणारा परिणाम आणि त्याचे फायदे-तोटे, विधी सेवा प्राधिकरणाच्या कक्षा विकसित करण्याची गरज, विधीविषयक संशोधनाची आवश्यकता याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात अतिथी न्यायमूर्ती अभय ओक तसेच जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी विधीज्ञ अ‍ॅड. विलास नाईक यांच्या ‘शब-ए-बारात’ या कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य नीलम हजारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या मार्गदर्शनपर व्याख्यान सत्रामध्ये जनता शिक्षण मंडळाचे ईसी आणि सीडीसी सदस्य, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, अधिवक्ता परिषदेचे सदस्य, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विधी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. संदीप घाडगे, प्रा. नीलम म्हात्रे, प्रा. चिन्मय राणे, प्रा. कौशिक बोडस, प्रा. सूरज पुरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात हातभार लावला. प्रा. पियुषा पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Exit mobile version