। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतरही खुर्चीला चिकटून बसलेल्या भाजपच्या पदच्युत दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी चोंढी येथे आलेल्या विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना थेट लोकसभेचे अध्यक्ष करुन टाकले. जिल्हध्यक्ष म्हणून स्वागताचे बॅनर झळकवताना त्यांचा उल्लेख चक्क लोकसभा अध्यक्ष म्हणून केला आहे.
उच्च विद्याभूषित असणार्या मोहिते यांच्याकडून ही चूक घडली. याबाबत जिल्ह्यात मोहितेंचे हसे होत आहे. याच बॅनरमध्ये त्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून स्वतःचा उल्लेख केला आहे. दक्षिण रायगडचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्यावर महिलेने आरोप करीत महिला आयोगाकडे न्याय मागितला होता. याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे जुलै महिन्यात भाजपच्या वरिष्ठांनी अॅड. महेश मोहिते यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेत त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला.
सध्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार उत्तर जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असे असतानाही अध्यक्ष पदापासून दूर राहणे मोहितेंना जड जात आहे. त्यामुळे पदावरून हटवलेले असतानाही मोहिते अजूनही अध्यक्ष म्हणूनच स्वतःचा उल्लेख जाणीवपूर्वक करीत आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिशाभूल करीत चणेरा प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी पदापासून अलिप्त राहणार असल्याचा कांगावा केला होता. मात्र या बॅनरबाजीतून मोहिते यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे.