जनसामान्यांचे राज्य निर्माण करणार: ॲड. मानसी म्हात्रे

। पनवेल । प्रतिनिधी ।

78 वर्षे या शेतकरी कामगार पक्षाला झाली, 78 वर्षे हा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आजही डौलानं फडकत आहे, त्याची साक्ष आजचा हा मेळावा आहे. गेलेल्यांना आम्ही मोजत नाही, पण आलेल्यांसोबत जनसामान्यांचे आणि कष्टकऱ्यांचे राज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्याशिवाय हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही, असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पक्षाची एकनिष्ठता या मेळाव्यातून न्यायची आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपला पक्ष वाढला पाहिजे, ही खूणगाठ बांधून या मेळाव्यातून जायचे आहे. केवळ पक्ष वाढवायचा नाही, तर पक्षाला सत्तेपर्यंत न्यायचे आहे, ही खूणगाठ सगळ्यांनी बांधायची आहे, असे आवाहनही मानसी म्हात्रे यांनी केले.

यावेळी त्यांनी पक्षनेतृत्वाचे म्हणजेच पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, गेले वर्षभर सातत्याने पक्षनेतृत्वाकडे मागणी करत आहे की, माझ्या महिला कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये वरचे स्थान द्या. त्यांना संघटनेमध्ये काम करु द्या. त्यानुसार आज आम्हाला वीस टक्के जागा या पक्षनेतृत्वाने संघटनेमध्ये दिल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा आभार मानले. त्या म्हणाल्या संघटनेमध्ये जरी आम्ही वीस टक्के असलो, तरी या मेळाव्यामध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहोत. याची नोंद या मेळाव्याच्या निमित्ताने घ्यावी लागले. मला माझ्या महिला भगिनींना सक्षम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाची महिलांची या जिल्ह्यामध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये एक मजबूत संघटना मला घडवून आणायची आहे. महिला भगिनींना सांगायचे आहे, की जे रणशिंग आज आपण फुंकतोय, ते स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता फुंकतोय. भले आज पक्षाचा वर्धापनदिन असेल, पण या वर्धापन दिनाच्या दिवशीच मला सक्षमतेचा नारा या मेळाव्यातून द्यायचा आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझ्या महिला पन्नास टक्के पदाच्या धनी आहेत, आणि त्या पन्नास टक्के पदांना न्याय देण्याचे काम शेकापची माझी महिला खंबीरपणे करेल, याची मला खात्री आहे, असा विश्वास ॲड. म्हात्रे यांनी व्यक्त केला.

पुणे विद्यापीठाला ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंचे नाव दिले, त्याचप्रमाणे ज्या जिजाऊंनी रायगडच्या नारीशक्तीच्या स्वाभिमानाचा अंगार फुलविला, त्या माझ्या जिजाऊंचे नावदेखील मुंबई विद्यापीठाला दिले गेले पाहिजे, अशी मागणी या मेळाव्याच्या निमित्त मी या समस्त माझ्या रायगडच्या, महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांच्या वतीने करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून या महिला आक्रमकपणे या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काम करीत आहेत. स्मार्ट मीटरचा मुद्दा घेऊन आम्ही महिला या सरकारबरोबर भांडत आहोत. आणि हा स्मार्ट मीरटचा आपला लढा येत्या नजीकच्या काळात मोठ्या स्वरुपात वाढवावा लागेल, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना केले.

पक्षनेतृत्वाने आपल्यावर दिलेली जबाबदारी ही आपल्याला ठामपणे सिद्ध करावी लागेल. पक्षाचा मजबूत काळ या ठिकाणी निर्माण होत असताना माझ्या रायगडच्या महिलांचा मात्र हिरकणीचा एक बुरुज रोवला जाईल, याची खात्री ॲड. म्हात्रे यांनी दिली.

शेवटी त्यांनी औरते उठी नही तो जुलूम बढता जायेगा, आओ मिलकर हम बढे, हम हक हमारा छिनले, काफिला अब चल पडा है, अब ना रोका जायेगा, अब ना रोका जायगा.. या चारोंळीतून समस्त महिलांमध्ये अंगार फुलविण्याचे काम केले.

Exit mobile version