स्थानिक तक्रार समिती पुर्नगठित अध्यक्षपदी ॲड निहा राऊत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नुसार महिलांना संरक्षण देणे लैंगिक छळास प्रतिबंध करणे या अधिनियमातील कलम ६ नुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हाधिकारी (निवडणुक) स्नेहा उबाळे यांना प्राधिकृत केले आहे. त्यांना या समितीचे जिल्हा अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केले आहे. त्यानुसार जिल्हा अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर “स्थानिक तक्रार समिती” पुर्नगठित केली आहे. या समितीमधील सदर अधिनियमातील निकषानुसार अध्यक्ष व सदस्य पदासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत महिलांची नियुक्ती केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ॲड निहा अनिस राऊत अलिबाग, त्याचप्रमाणे सदस्यपदी स्वाती चंद्रविलास शेट, पोलादपुर, तपस्वी नंदकुमार गोंधळी अलिबाग, जिवीता सुरज पाटील अलिबाग यांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकार विनीत म्हात्रे आहेत.तसेच सदर अधिनियमातील कलम ६ चे (पोटकलम) २ नुसार ग्रामीण क्षेत्रासाठी सर्व ग्रामपंचायत कार्यालये व पंचायत समिती यासाठी प्रत्येक गटातील गटविकास अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून निवड केली आहे. तसेच नागरी क्षेत्रासाठी प्रभाग किंवा नगरपालिका/नगरपंचायत आधिपत्याखाली सर्व कार्यालयातील मुख्याधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणुन निवड केली आहे. तसेच तालुका पातळी वरील सर्व कार्यालये (पंचायत समिती द नगरपालिका/नगरपंचायत वगळून) तसेच तहसील कार्यालयाच्या क्षेत्रासाठी सर्व कार्यालयातील तहसीलदार यांची समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणुन निवड केली आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड अलिबाग तसेच स्थानिक तक्रार समिती सचिव विनीत म्हात्रे, जिल्हा परिविक्षा अधिकारी शकुंतला वाघमारे यांच्या शुभहस्ते निवड प्रत देण्यात आली.

Exit mobile version