घराघरांतून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे; अ‍ॅड. निला तुळपुळे यांचे प्रतिपादन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
एकत्र कुटुंब पद्धतीवरून आपण विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारल्याने घराघरातून संवाद थांबला असल्याने अपयशाला सामोरे जाताना आवश्यक ते मार्गदर्शन वा आधार मिळत नाही. युवा पिढीचा आत्मविश्‍वास कमी झाल्याने निराशेच्या क्षणी आत्महत्येचे प्रयत्न केले जातात अथवा व्यसनाधिनतेकडे वळतात. यासाठी घराघरातून परस्परांशी संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ व समुपदेशक अ‍ॅड. निला तुळपुळे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे व्यक्त केले.

लायन्स क्लब रोहा व लायन्स क्लब कोलाड रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ङ्गअपयशाला सामोरे कसे जाल?फ या विषयावर मार्गदर्शन करताना अ‍ॅड. तुळपुळे बोलत होत्या. कला विभागप्रमुख प्रा. सतीश सावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब रोहाचे खजिनदार पराग फुकणे, लायन्स क्लब कोलाड रोहाचे सेक्रेटरी रवींद्र लोखंडे, खजिनदार डॉ. श्याम लोखंडे, संचालक अनिल महाडिक उपस्थित होते.

नकार स्वीकारण्याची मानसिकता तयार होण्यासाठी लहानपणीच मुलांना काही गोष्टी नाकारण्याची जबाबदारी पालकांची आहे. प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात मागील पिढी कमी पडल्याने नव्या पिढीला स्वतःच पाहिलेले आभासी जगातील गोष्टी आदर्श वाटत असल्याची खंत निला तुळपुळे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या वतीने बोलताना अमिषा बारसकर हिने सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले, तर स्वराज सकपाळ याने नकारात्मक परिस्थितीची कारणमीमांसा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा सिंग यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. सूर्यकांत अमलापुरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version