चौपदरीकरण आरोग्य सेवेच्या मुळावर

सर्व्हिस रोड अभावी रुग्णवाहिकांची धावपळ

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर शहर आणि तालुक्यात महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. मात्र यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाकडे जाण्यासाठी अंडरपास महामार्गावरील पाचही पुलांनी जोडलेल्या पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानाजवळ संपुष्टात येत आहेत. नियोजित लांबीचे सर्व्हिसरोड केले नसताना ग्रामीण रूग्णालयासमोरील रस्ता दुभाजक तोडून चौपदरीकरणाच्या दोन्ही मार्गिका जोडण्यात आल्या असल्यामुळे ग्रामीण रूग्णालयामध्ये सध्या रूग्ण आणि रूग्णवाहिका नेणे सुकर होत आहे. मात्र, याठिकाणी तोडण्यात आलेला रस्ता दुभाजक पुन्हा जोडल्यास भविष्यात रूग्ण अन् रूग्णवाहिकांना उलटासुलटा प्रवास करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाजवळ पूर्णत्वास गेले आहे. मात्र, पोलादपूरच्या पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड आणि त्यावरील ड्रेनेज कम फूटपाथचे काम पूर्ण झाले असून त्या सर्व्हिसरोडची रूंदी 7.50 मीटर्स तर लांबी 1080 मीटर्स तर ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अंतिम आराखडयामध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील ग्रामीण रूग्णालयासह पार्टेकोंडपर्यंत सर्व्हिसरोड व ड्रेनेज कम फुटपाथ असूनही हा पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड प्रभातनगरपर्यंतच दिसून येत आहे. पोलादपूर घाटेआवाड येथे आराखडयानुसार ड्रेनेज कम फूटपाथची रूंदी 1.5 मीटर्स असण्याऐवजी केवळ दोन फूट असलेली दिसून येत आहे. प्रत्यक्षात आणि आराखडयामध्ये असलेल्या लांबी रूंदीतील तफावतीमुळे पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोड ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणातून पार्टेकोंडपर्यंत न जाता त्याआधीच प्रभातनगरपर्यंत संपलेला असल्याने ग्रामीण रूग्णालयापर्यंत रूग्ण आणि रूग्णवाहिका येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

मध्यंतरी कापडे येथील एका व्यक्तीला ग्रामीण रूग्णालयासमोरील रस्ता दुभाजकासमोर एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना झाली. या प्रकारच्या धोकादायक रोड क्रॉसिंगमुळे अपघाताची शक्यता वाढीस लागली असल्याने भविष्यात पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाकडे रूग्ण आणि रूग्णवाहिका नेणे सोपे जाण्यासाठी दोन्ही बाजूचे सर्व्हिसरोड नियोजित लांबीचे होण्याची गरज आहे. तसेच पूर्वेकडील रूग्णवाहिका आणि पश्‍चिमेकडील रूग्णवाहिकांना ये-जा करता येईल, अशी सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version