उमेदवारांची होणार गोची

गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून तीनदा जाहिरात द्या; आयोगाचे निर्देश

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या गुन्ह्यांबाबत वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिनीतून तीनदा जाहिरात द्यावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. शनिवारी (दि. 28) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. आयोगाच्या या मास्टरस्ट्रोकमुळे इच्छुक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण, गुन्हा दाखल असणार्‍या उमेदवारांना त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सांगावे लागणार आहे. तसचे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना उमेदवारी का दिली? याबाबत संबंधित राजकीय पक्षांना कारण द्यावे लागणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवाराशिवाय चांगले उमेदवार नव्हते का? याबाबतही कारण द्यावे लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांसह राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील 11 राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार पत्रकार परिषदेत दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, महाराष्ट्रात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही या दौर्‍यादरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही भागधारक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि डीजीपी यांची भेट घेतली. आम्ही बसपा, आप, सीपीआय (एम), काँग्रेस, मनसे, सपा, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना अशा एकूण 11 पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी, देव दिवाळी आणि छठपूजा यासारख्या सणांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात राज्यात दिवाळी, दसरा यासारखे मोठे सणवार येत आहेत. त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर करताना याचा विचार करण्यात यावा. सण, उत्सव लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची विनंती पक्ष नेत्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

पैशांचा वारेमाप होणारा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी. आठवड्याच्या मधल्या काळात निवडणूक घेण्यात याव्यात. फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रावर सोयी-सुविधा देण्यात याव्यात. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

दारुपार्टी, पैसेवाटपावर करडी नजर
दरम्यान निवडणूक आयोगाची दारुपार्टी-पैसेवाटपावर करडी नजर असणार आहे. विविध निवडणुकांआधी मतदारांना प्रलोभने देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांना साड्या, पुरुषांना दारु-पैसे दिले जातात. मात्र, आता अशा प्रकारांवर निवड आयोगाची करडी नजर असणार आहे.जिथे पैसे, दारू, गिफ्ट दिले जात असतील, तर त्यावर कठोर कारवाई होणार. आम्ही या वाटपावर अधिक लक्ष देणार, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार - 9.59 कोटी
पुरुष मतदार - 4.95, स्त्री 4.64 कोटी
तृतीयपंथीय मतदार - 5997
दिव्यांग मतदार - 6.32 लाख
8 लाख 186 मतदान केंद्रे
पहिल्यांदा मतदान करणारे मतदार - 19.48 लाख
महिला मतदारांमध्ये 10.77 लाखांची वाढ
एकूण पोलिंग स्टेशन 1 लाख 186
शहर: 42 हजार 585,
ग्रामीण: 57 हजार 601
एटीएम व्हॅनवर निर्बंध, अ‍ॅम्ब्ल्युलन्सवर नजर
महाराष्ट्राला सहा राज्यांच्या सीमा आहेत. या सीमांवर 300 चेकपोस्ट तयार केले जातील. जेणेकरून अवैध रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू राज्यात आणण्यापूर्वी रोखली जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि एटीएममध्ये रोख रोक्कम भरण्यासाठी जी कॅश व्हॅन वापरली जाते, त्यावरही नजर ठेवली जाईल. संध्याकाळी सहा ते दुसर्‍या दिवशी आठ वाजेपर्यत या व्हॅन वापरल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कुमार यांनी दिले आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या काळात हेलिकॉप्टरचा वापर होतो. अशा वेळी हवाईमार्गे बेकायदेशीररित्या वस्तूंची वाहतूक होऊ नये म्हणून सर्व हेलिपॅड्सवर हेलिकॉप्टर्सची तपासणी केली जाईल, असेही राजीव कुमार म्हणाले.
Exit mobile version