| पनवेल । वार्ताहर ।
शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी एकीकडे पनवेल पालिकेकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत, तर दुसरीकडे संरक्षक भिंती, झाडे व ठिकठिकाणी विनापरवाना जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
पनवेल पालिका परिसरात जाहिरातदार व ठेकेदारांवर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही प्रकारची जाहिरात करायची असल्यास ती ठेकेदारामार्फत किंवा संबंधित राजकीय पुढार्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी असलेल्या संरक्षक भिंती, रेल्वे स्टेशन, बस थांबे, तसेच जाहिरात फलकांवर पत्रके चिकटवल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जाहिरात लावल्यानंतर तिथेच मजकूरही लिहिला जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण व परवाना विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करून शहराचे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पालिका क्षेत्रात बॅनर, फ्लेक्स लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येत नाही. पालिका जाहिरात संबंधित धोरण ठरवले जात आहे. बेकायदा जाहिरातींवर कारवाईचे आदेश वार्ड अधिकार्यांना दिले आहेत.
जयराम पादीर
परवाना विभाग, पनवेल