लालपरीवर महायुतीच्या जाहिराती

प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगात तक्रार

| वाशिम | प्रतिनिधी |

राज्य परिवहन मंडळाच्या बसवरुन महायुतीचा प्रचार होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी निवडणूक विभागाला टॅग करून प्रश्‍न विचारला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हा प्रचारासाठी कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाशिम आगाराच्या बस क्र. एम.एच. 40 वाय. 5347 वर महायुतीचा प्रचार करणारे पोस्टर लावलेले असून त्या संदर्भात त्यांनी ही पोस्ट केली आहे. देशात लोकसभा निवडणूक सुरू असून सर्वच पक्षाकडून जोरात प्रचार सुरू आहे. मात्र भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे प्रचार पोस्टर चक्क एसटी महामंडळाच्या बसेसवर लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर महायुती निशाणी धनुष्यबाण असं लिहलेलं असून धनुष्यबाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट करुन सार्वजनिक मालकीच्या वाहतुकीवर याची परवानगी कशी आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या काळात कुठेही अशाप्रकारे बॅनर, फोटो वापरता येत नाहीत. अशा काळात सरकारी एसटी बसवर महायुतीचा बॅनर कसा काय दिसतोय, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक विभागाला केला आहे.

Exit mobile version