| अलिबाग | प्रतिनिधी |
आंबेपूरची भूमी संघर्षाची भूमी आहे. ही तीच भूमी आहे जिथे स्व. नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कर्मयज्ञ उभा केला. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद जनतेला दिली. त्या संघर्षशील विचारांच्या परंपरेतूनच शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा उभा आहे. आज तोच लाल बावटा खांद्यावर अभिमानाने पेलण्याचे काम ॲड. पूजा भगत करत आहेत. त्यांचा लढा व्यक्तीविरोधात नाही, तर विचारांसाठी आहे. सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी आहे. संपत्ती मोजक्यांच्या हातात साठू नये, तर ती जनतेच्या हातात यावी हा त्यांचा ठाम विचार आहे.
आज ॲड. पूजा भगत हे नाव आंबेपूर गटात आशेचे आणि परिवर्तनाचे प्रतीक बनत आहे. जनतेसोबत चालणारे, विचारांशी निष्ठावान आणि संघर्षाची परंपरा जपणारे हे नेतृत्व या निवडणुकीत केवळ मतांचा नव्हे, तर विचारांचा कौल मागत आहे. आंबेपूर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ॲड. पूजा भगत या केवळ उमेदवार नाहीत तर जनतेतून घडलेले आणि जनतेसाठी उभे राहिलेले नेतृत्व आहेत. सुशिक्षित, जागरूक आणि समाजाच्या प्रश्नांशी थेट जोडलेली ही उमेदवार राजकारणाकडे सत्तेच्या माध्यमातून नव्हे तर सेवेच्या दृष्टीने पाहत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. शेकापच्या पूजा भगत स्कुटीवरून येतात. थेट घराघरात जातात. हातात हात घालून संवाद साधतात. कारण त्यांना जनतेत आणि स्वतःत कुठलीही दरी नको आहे. जनतेला त्या आपल्यातीलच एक वाटल्या पाहिजेत हीच त्यांची भूमिका आहे.
जनता फक्त मतदानासाठी उपयोगाची नसते. जनता सक्षम झाली पाहिजे. जनता समृद्ध झाली पाहिजे. त्यासाठी रोजगार मिळाला पाहिजे. विकास फक्त रस्ते आणि इमारतीपुरता मर्यादित न राहता तो माणसाच्या आयुष्याशी जोडलेला असला पाहिजे. विकासासोबत शाश्वत समृद्धी मिळाली पाहिजे. हीच पूजा भगतच्या विचारांची दिशा आहे. सुशिक्षित नेतृत्व समाजाला योग्य दिशा देऊ शकतं याचा विश्वास त्या निर्माण करत आहेत. विचारांशी निष्ठा ठेवून जनतेसोबत चालणारी ही वाट आंबेपूर गटाला नवी दिशा देणारी ठरेल अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
निवडणूक आली की राजकारणात अचानक गाड्यांचा ताफा वाढतो, घोषणा मोठ्या होतात आणि नेते जनतेपासून अधिकच दूर जातात. सत्ता मिळवणे हेच अंतिम ध्येय असल्यासारखे चित्र उभे राहते. अशा काळात आंबेपूर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ॲड. पूजा भगत मात्र या सत्ताकेंद्रित राजकारणाला थेट छेद देताना दिसत आहेत.
शेती, पाणी आणि न्यायाचा लढा
आंबेपूर गटातील ग्रामीण वास्तव ॲड. पूजा भगत यांना जवळून माहित आहे. शेतीमालाला योग्य दर न मिळणे, पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुर्दशा, आरोग्य व शिक्षण सुविधांचा प्रश्न केवळ कागदावर मांडून संपत नाहीत, तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, याची त्यांना जाणीव आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या परंपरेप्रमाणे शेती, जमीन आणि पाणी हे प्रश्न केंद्रस्थानी ठेवूनच त्यांची भूमिका राहिली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, तर शेतकरी हा विकासाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम झाल्याशिवाय खरा विकास शक्य नाही, असा ॲड. पूजा भगत यांचा स्पष्ट आग्रह आहे. ग्रामीण प्रश्नांची जाण, महिलांच्या सशक्तीकरणाची स्पष्ट भूमिका आणि युवकांना संधी देणारी विकासदृष्टीया तिन्हींचा संगम म्हणजे ॲड. पूजा भगत यांचे नेतृत्व. म्हणूनच ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर समाजाच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडण्याची ठरणार आहे.
युवकांना रोजगार हवा
ॲड. पूजा भगत यांच्या मते विकास असा हवा की, युवकांना आपल्या गावातच रोजगार मिळावा. कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युवकांना संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. युवकांच्या हाताला काम मिळाले, तर गाव टिकते, समाज टिकतो आणि भविष्य सुरक्षित होते. युवक केवळ मतदार नसून परिवर्तनाची शक्ती आहेत, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
सशक्तीकरण कागदावर नव्हे, प्रत्यक्षात
महिला सशक्तीकरणाच्या घोषणा अनेकदा फक्त भाषणांपुरत्याच मर्यादित राहतात. मात्र ॲड. पूजा भगत या स्वतः एक सुशिक्षित महिला नेतृत्व असल्याने महिलांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर ठामपणे पाहतात. महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी, सुरक्षितता, आरोग्य सुविधा आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळाला पाहिजे, यावर त्यांचा भर आहे. बचतगट, स्थानिक उद्योग, प्रशिक्षण आणि कायदेशीर जागरूकता या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला सशक्त झाली, तर कुटुंब सशक्त होते आणि कुटुंब सशक्त झाले, तर समाज बदलतो हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
