| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव – दिघी या राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम गेली तीन वर्ष सुरु असून, माणगाव तालुक्यातील हद्दीतील साई ते मोर्बा या सुमारे 18 कि.मी. अंतरावरील कांही शेतकर्यांच्या जमिनी संबंधित बाधित शेतकर्यांना कसलीही भूसंपादनाची भरपाई न देता, रस्त्यालगतच्या जमिनीवर बुलडोझर फिरवीत भूसंपादानापुर्वीच सरकारने अतिक्रमण केले आहे. ज्या शेतकर्याच्या जमिनी रस्त्यात घेतल्या आहेत. मात्र ते बाधित शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाकडे हेलपाटे मारून तो मेटाकुटीला आला आहे.
माणगाव ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तीन वर्षा पूर्वी मंजूर झाला असून या महामार्गाला अर्थिक मंजूरीही मिळाली होती. त्यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू झाले होते. हा मार्ग तीन वर्षा मध्ये पुर्ण करण्याचे केंद्र सरकारचे आदेश होते. मात्र हा सर्व परिसर दुर्गम व डोंगराळ असल्याने या मार्गास अनेक अडथळयाची शर्यंत पार करीत या मार्गाचे काम सुरु करण्यात आले होते.
माणगाव तालुक्याच्या हद्दीतील मोर्बा, बोर्ले, सुर्ले, डोंगरोली, उसर बु, साई या सहा गावातील माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ. साठी सहा गावातील 392 खातेदार असून मंजुर मोबदल्यासाठी बोर्ले व सुर्ले या दोन गावातील बाधित खातेदारांना भूसंपादन मोबदला वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकरी खातेदारांना मोबदला वाटप करणे बाकी आहे. आता पर्यत 11,52,53,139 रुपये एवढे मोबदला रक्कम होते. त्यापैकी 96,73,622 एवढी खातेदारांना भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात आली आहे.
अनेक बाधित शेतकर्यांना अद्यापही नुकसान भरपाईचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी या भरपाईच्या प्रतीक्षेत असून मेटाकुटीला आला आहे. माणगाव तालुक्यातील मोर्बा, बोर्ले, सुर्ले, डोंगरोली, साई, उसरबुद्रुक या सहा गावातील क्षेत्र 8.90.36 हे. बाधित आहे. तर इंदापूर तळा आगरदांडा मार्ग क्र. 548 ए. या महामार्गासाठी माणगाव तालुक्यातील उमरोली तर्फे दिवाळी, निवी, मुठवली तर्फे तळे, तसेच तळा तालुक्यातील पिटसइ, तळा, मांदाड या तीन गावातील रस्त्यासाठी क्षेत्र 1.97.1 हेक्टर बाधित आहे. बाधित शेतकर्याना भरपाई अद्यापही शासनाकडून मिळालेली नाही. माणगाव – दिघी पोर्ट या राष्ट्रीय महामार्गांचा क्र. 753 एफ असून त्याची एकूण लांबी 159 कि.मी. आहे. यातील माणगाव ते दिघी पोर्ट रस्त्याच्या 55 कि. मी. अंतर असून उर्वरित 104 कि.मी. अंतरा पैकी 65 कि. मी. रस्ता पुणे जिल्हयाच्या हद्दीतून जातो. या रस्त्याचे काम दोन टप्प्यात शासनाकडून करण्यात येणार आहे रायगड जिल्हयाच्या हद्दीपासून कोंडेथरघाट ते माणगाव रस्त्यासाठी सुमारे 200 कोटी रूपयांचा निधी लागणार आहे.