| मुंबई | प्रतिनिधी |
आमदार अपात्रता प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून अपात्रता मुद्दा सोडून इतर विषयात अध्यक्ष वेळ घालवत आहेत, असा आरोप ठाकरे गटाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी 25 सप्टेंबरला विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. या सुनावणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक सर्व आमदारांना पाठवल्यानंतर, ठाकरे गटाच्या आमदारांकडून आक्षेप घेतला गेला आहे. या सगळ्या सुनावणीच्या प्रक्रियेत वेळकाढूपणा करणे म्हणजे घटनेच्या विरोधात असलेल्यांना एक प्रकारे संरक्षण देण्याचे , काम अध्यक्ष करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.