३३ अनुसूचित जमातींच्या न्यायासाठी ऑफ्रोह आक्रमक

16 मार्च रोजी विधान भवनावर धडक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

45 अनुसूचित आदिवासी जमातींपैकी 33 जमातींना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र नाकारले जाते. त्यांना बोगस ठरवले जाते. त्याविरोधात ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) संघटना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात शासन आणि यंत्रणेला जाब विचारण्यासाठी या 33 अनुसूचित आदिवासी जमातींचा मोर्चा 16 मार्च रोजी मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे.

ऑफ्रोहचे रायगड जिल्हा सचिव जलदीप तांडेल यांनी दिली. 2011च्या जणगणनेनुसार एकीकडे 45जमातीच्या 9.25 टक्के आदिवासींच्या लोकसंख्येच्या आधारावर केंद्र सरकारकडून कोट्यवधींचा निधी बळकवायचा, याच लोकसंख्येच्या आधारावर आदिवासी 25 आमदार व 4 खासदारांची पदे मिळवायची; मात्र याच लोकसंख्येतील 61 टक्के लोकसंख्या असलेल्या 33 अनुसूचित जमातींना ‘बोगस’ म्हणायचे, त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्यायचे नाही, ही भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप जलदीप तांडेल यांनी केला आहे. या प्रश्‍नावर गेली अनेक वर्षे ऑफ्रोह लढा देत आहे. हा लढा आता अधिक तीव्र करून या सर्व अन्यायग्रस्त जमातींना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही तांडेल यांनी दिला आहे.

ऑफ्रोहच्या प्रमुख मागण्या
आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रमाणेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी जमातींचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावेत, आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातींच्या सर्व योजना आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासींना लागू करा. 33 अन्यायग्रस्त जमातीला न्याय मिळत नसेल तर विस्तारीत क्षेत्रातील 33 अनुसुचित जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या 14 बोगस आदिवासी व 2 बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, माजी न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात 6 हजार 500 कोटींचा भ्रष्टाचार करणार्‍यांना तुरुंगात टाका , आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष सुरेश धस यांच्या आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा, अनुसूचित जमाती जातप्रमाणपत्र तपासणी समितीने ’प्रधान’ यांना ’परधान’ जमातीचे, ’आंध’ यांना ’अंध’ जमातीचे, ’बुरूड’ यांना ’गोंड’ जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समितीची व अधिका-यांची चौकशी करा अशा मागण्या ऑफ्रोहच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदान येथे 16 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अन्यायग्रस्त जमातीमधील आदिवासी समाज बांधव व कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सामील व्हावे,असे आवाहन ऑफ्रोह च्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष संदेश चोगले, उपाध्यक्ष मोरेश्‍वर हाडके, महिला अध्यक्षा राजेश्री बंदरी प्रसिद्धी प्रमुख सुभाष भोबू सहसचिव जितेंद्र मकू,संघटक ज्ञानराज सारंग, कोषाध्यक्ष देवानंद भोळे भावी, संघटक संतोष पेरेकर तसेच विजय भगत यांनी केले आहे.

अन्यायग्रस्त प्रमुख जमाती
हलबा, हलबी, कोळी महादेव, माना, गोंडगोवारी, राजगोंड, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी व तत्सम कोळी, ठाकूर, ठाकर, धनगड, धनगर, मन्नेवार, मन्नेवारलु, राज, धोबा, छत्री, सोनझरी, पावरा, भिल्ल

Exit mobile version