27 तासांच्या प्रयत्नानंतर तो सापडला

| अलिबाग | प्रतिनिधी |
नातेवाईकांसोबत काशिद समुद्रात पोहत असताना, तरुण पर्यटक शुक्रवारी सकाळी पाण्यातून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरु होता. मात्र तब्बल 27 तासाच्या प्रयत्नानंतर तो शनिवारी दुपारी मृतावस्थेत सापडला. या तरुणाच्या अपघाती निधनानंतर पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जुनेद शेख (21) असे या पर्यटकाचे नाव आहे. तो पुणे येथील महाविद्यालयात द्वीतीय वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्याच्या कुटूंबातील सर्व मंडळी गुरुवारी सायंकाळी काशिद समुद्रकिनारी फिरण्यास आले होते.

शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी काहीजण गेले. त्यात जुनेददेखील पोहत होता. मात्र पाण्याच्या प्रवाहात तो बेपत्ता झाला. ही माहिती मांडवा सागरी पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीव रक्षक, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्याचा शोध युध्द पातळीवर सुरू होता. संध्याकाळनंतर शोध थांबविण्यात आला. पुन्हा शनिवारी सकाळी त्याला शोधण्यास सुरुवात झाली. अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काशिद समुद्रात तो मृतावस्थेत सापडला.

Exit mobile version