| आगरदांडा | प्रतिनिधी |
हवामानात अचानक बदल झाल्यामुळे वादळी पाऊस, सोसाट्याच्या वारा व समुद्र खवळल्याने मासेमारी करिता गेलेल्या ठिक ठिकाणच्या 150 बोटी आगरदांडा व दिघी बंदरात अश्रायला आल्या होत्या. मात्र, 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हवामानाचा अंदाज घेत ‘वल्हवरे नाखवा वल्हव वल्हव’ करत बोटी पुन्हा मासेमारी करिता दर्यात निघाल्याने कोळी बांधवांमध्ये उत्साह दिसुन आला.
मासेमारी बंदी उठल्यानंतर काही मासेमारी कोळी बांधवांनी 1 ऑगस्ट पासून मासेमारीला सुरूवात केली. परंतु, अचानक जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटीतील नाखवा व खलाशांनी जवळपासच्या किनाऱ्यावर आश्रय घेतला होता. यावेळी मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदर व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराजवळील समुद्रात सुमारे 150 बोटी विसावल्या होत्या. त्यामध्ये राजपुरी, मुरुड-एकदरा व दिघीच्या 59 बोटी, वेरावळ-गुजरातच्या 40 बोटी, रत्नागिरीतील पाजपंढरी व हरणाईच्या 35 बोटी, अलिबागच्या 8 बोटी, तर मुंबईतील वर्सोवाच्या 8 बोटी नांगर टाकून अश्रायला थांबल्या होत्या. अखेर, रविवारी (दि.24) पाचव्या दिवशी सकाळपासून आकाशात शुभ्र ढग दिसू लागल्याने हवामानाचा अंदाज घेत नाखवांनी नांगरलेल्या बोटीचे नांगर उचलून पुन्हा आपल्या बोटी खोल समुद्रात मासेतारी करिता उतरवल्या. वादळामुळे गेले पाच दिवस मासेमारी ठप्प असल्याने कोळी मच्छीमार बांधवांना आर्थिक संकटात सापडला होता. परंतु, आता त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस त्यात समुद्र खवळत असल्याने मासेमारी करिता गेलेल्या बोटींनी आगरदांडा व दिघी बंदराजवळ समुद्रात नांगर टाकुन अश्राय घेतला होता. आम्ही या ठिकाणी भेट देऊन विचारपूस केली होती. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने बोटींच्या कागदपत्रांची देखील तपासणी केली होती. बोटीतील नाखवांनी हवामानाचा अंदाज घेऊन बोटी पुन्हा समुद्रात मासेमारी करिता सोडल्या आहेत. मात्र, काही स्थानिक बोटी अजूनही आगरदांडा बंदराजवळ उभ्या आहेत.
अक्षय साळुंखे,
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास तथा परवाना अधिकारी






