न्यायालयाच्या आवारात शोध मोहीम सुरू
। मुंबई । प्रतिनिधी ।
दिल्लीनंतर मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे उच्च न्यायालय आणि परिसर मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांच्या खोलीच्या कोर्टरूममध्ये 3 बॉम्ब ठेवले आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत न्यायालय रिकामा करा.’ असा संदेश असणारा ई-मेल शुक्रवारी (दि.12) सकाळी 10.41 वाजता दिल्ली उच्च न्यायालयाला मिळाला. तसंच यामध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडू यांच्यात संगनमत असल्याचेही लिहिले आहे. त्यानंतर थोड्याच वेळाने मुंबई उच्च न्यायालयातही बॉम्ब ठेवण्याचा ई-मेल आला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला आणि न्यायाधीश, वकिलांना चेंबर बाहेर काढण्यात आले.
धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाले असून खबरदारी म्हणून दोन्ही ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच शोध मोहीम सुरू आहे.
