| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावात भोईर फौजदार कुटुंब गेली अनेक दशके वास्तव्य करत आहेत. कामानिमित्त परगावी जाणारी भावकी जरी वास्तव्यास बाहेर राहिले असले तरी त्यांची घरे मात्र गावात आहेत. दिवसेंदिवस एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चालला आहे. असे जरी असले तरी आपले कुटुंब एकत्र असावे अशी भावना मनात येते. प्रत्येक जण मोबाईलमुळे एका मिनिटात एकमेकांजवळ बोलत असला तरी एकत्र येऊन सहभोजन करून आपल्या सुखदुःखाची आदान प्रदान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झाली पाहिजे ही भावना भोईर फौजदार भावकीला सुचली व तब्बल पाच पिढ्यानंतर देवकान्हे भोईर फौजदार भावकी एकत्र आली. एकीच्या भावनेने भोईर फौजदार भावुक झाल्याचे दिसले. वयोवृद्ध, सेवानिवृत्त झालेल्या पिढीला आनंदअश्रू अनावर झाले. एकत्रित कुटुंबाची भावना ठेवणारी भोईर फौजदार भावकी समजापुढे आदर्श देणारी आहे, असे आता तालुक्यात बोलले जात आहे.
देवकान्हे गावातील भोईर फौजदार भावकीचे कुटुंब प्रमुख स्व. कानू कृष्णा भोईर व स्व. भागीरथी कानू भोईर यांची मुले रामजी, आंबाजी, नामदेव, जानू, देवजी, हिराजी आणि कुशीबाई यांची मुले, सुना, मुली, जावई नातवंडे यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य शंकर जानू भोईर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी कुटुंबातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिमा वैभव भोईर यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले कि, कुटुंबाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. कुटुंबातूनच आपणाला प्रेम, आदर, विश्वास, आशा, काळजी, संस्कृती, नीतिमत्ता, परंपरा अशी जीवनातील अनेक मूल्य शिकता येतात. घरातील प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, स्नेह, संरक्षण व सुरक्षा प्रदान करणारी सर्वश्रेष्ठ संस्था आहे असे म्हटले. तसेच आपण कुटुंबाचे नेहमीच ऋणी राहिले पाहिजे असे सांगितले.