कृषीवलच्या दणक्याने प्रशासन ताळ्यावर

खरबाचीवाडीत महिनाभरात घरपोच पाणी मिळेल

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीतील रहिवाशांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण सुरू आहे. याबाबतची बातमी कृषीवलने प्रकाशित केल्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग आली असून, महिनाभरात घरपोच पाणी मिळेल, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनायक गांगुर्डे यांनी दिली. कृषीवलने पाणीप्रश्‍नाला वाचा फोडल्याने आदिवासी बांधवांनी आभार मानले आहेत.

याबाबतची हकीकत अशी की, खरबाची आदिवासी वाडी येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाण्याची योजनेचे काम चालू आहे. हे काम गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. कालावधी पूर्ण होऊनसुद्धा येथील आदिवासी बांधवांना घरपोच पाण्याविना राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना जीव धोक्यात टाकून दीड ते दोन किलोमीटर खोल दरीत पाणी भरण्याची वेळ आलेले आहे. त्यामुळे येथील आदिवासी महिलांनी आवाज उठवताच तात्काळ रोहा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपाभियंता विनायक गांगुर्डे यांनी दखल घेऊन येथील आदिवासी महिलांना येत्या एक ते दीड महिन्यात घरपोच पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही दिली आहे.

याबाबत गांगुर्डे यांनी सांगितलं की, जवळपास या योजनेचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झालेले असून, काही किरकोळ कामे बाकी आहेत. त्यात मुख्यतः एमएसईबीचे मीटर बसवणे, एनओसी देणे, पंप सोडणे, पाण्याच्या टाकीचे प्लास्टर करणे इत्यादी. संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून पाणी पुरवठा चालू करण्याच्या सूचना ठेकेदारास तोंडी व लेखी पत्रव्यवहार वेळोवेळी करण्यात आल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.

खरबाची वाडी व इतर चार वाड्या मिळून येथील लोकसंख्या 1000 ते 1100 इतकी आहे; परंतु पाण्याचा प्रश्‍न इथे गंभीरित्या आहे. पाणी आणताना महिलांचा डोळ्यात अश्रू येतात, त्यामुळे जे काम रखडलं आहे, यासाठी रोहा ग्रामीण पाणीपुरवठा हा ठेकेदारावर अंकुश ठेवण्यात अपयशी झाला असून, याचा परिणाम येथील आदिवासी बांधवांना भोगावा लागत आहे, असा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.

महिलांना जीव धोक्यात टाकून खोल दरीतून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे. ठेकेदाराने वेळेत काम न केल्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकावं अन्यथा पाणीपुरवठा विभागाने काम पूर्ण करून द्यावे.

सुषमा पवार,
ग्रामस्थ, खरबाची वाडी

खरबाची वाडी येथील जलजीवन मिशन योजनेचे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याप्रमाणे ग्रामस्थांना पाणीदेखील चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

शुभदा पाटील-कुलकर्णी,
गटविकास अधिकारी, रोहा

Exit mobile version