आदिवासी सेवा संघाची महत्त्वाची भूमिका
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालक्याचे शेवटचे टोक असलेल्या शेलू ग्रामपंचायतीमधील आदिवासी लोकांनी खोदून टाकलेल्या रस्त्याबाबत बेडीसगाव आणि नऊ आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी आदिवासी सेवा संघाच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 9 मे रोजी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जुना रस्ता पूर्ववत करून देण्याचे आणि संबंधित व्यक्तीवर गुन्ह्याबद्दल पोलीस प्रशासनाने माहिती घ्यावी, अशी सूचना उपोषणकर्ते यांची भेट घेतल्यानंतर दिली. त्यात संबंधितविषयी 17 मे रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी उपोषणकर्ते यांना दिले आणि त्यामुळे बेडीसगावमधील असंख्य आदिवासी यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे.
आदिवासी सेवा संघाचे जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी आणि बेडीसगाव येथील ग्रामपंचायत माजी सदस्य मंगळ दरवडा यांनी तेथील 200हून अधिक स्थानिक आदिवासी यांच्यासोबत उपोषण सुरू केले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय बैठकांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे या उपस्थित होत्या. दिवसभर सुरू असलेल्या बैठका संपवून पालकमंत्री थेट उपोषणस्थळी पोहोचल्या आणि उपोषणकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधकारी पद्मश्री बैनाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता भारदस्कर हे सोबत होते. त्यावेळी सर्व परिस्थिती साधारण 15 मिनिटे ऐकून घेतल्यावर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी समजून घेतली आणि जुना रस्ता होता तसाच तयार करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता भारदस्कर यांना दिल्या. तर, सरकारी मालकीच्या रस्ता खोदणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी यांना दिल्या.
त्यावेळी उपोषणकर्ते जैतू पारधी यांनी सर्व निर्णयाचे लेखी निवेदन देण्याची विनंती केली असता, पालकमंत्र्यांनी रायगड जिल्हा परिषदेचा अखत्यारीत हा विषय आहे. मात्र, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हे रजेवर आहेत, त्यामुळे ते 14 मे रोजी हजर होत असून, 17 मे रोजी या विषयाची बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री यांच्याकडून अधिकारी वर्गाला देण्यात आले. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केल्यानंतर बेडीसगाव ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. मात्र, या महिन्यात या विषयाचा अंतिम निर्णय झाला नाही, तर बेडीसगाव ग्रामस्थांनी आपल्याला कधीही संपर्क करावा, असे आश्वासन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी 135 किलोमीटरवरून अलिबाग येथे उपोषण करण्यासाठी आलेल्या आदिवासी लोकांना दिले.