लोकसभा निकालानंतर चाळीसगावातील राजकारणाला कलाटणी

| जळगाव | वृत्तसंस्था |

जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीत खर्‍या अर्थाने जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील राजकारणाचा प्रभाव होता. निकालानंतर उमेदवारांच्या खासदारकीचा फैसला आहे. परंतु या तालुक्यातील राजकारणाला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळणार आहे. माजी खासदार उन्मेश पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील राजकारणाचा फैसला जनता करणार आहे. यावरच पुढे विधानसभेचे रणांगणही पेटणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ विरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्यात लढत झाली. परंतु खर्‍या अर्थाने सामना उमेदवार नसलेले चाळीसगावातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते व माजी खासदार उन्मेश पाटील विरूद्ध भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात झाला आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवारीपासून खर्‍या अर्थाने वाद सुरू झाला आहे. राजकीय घडामोडीपूर्वी पक्षाचे विद्यमान खासदार असलेले उन्मेश पाटील हे आपल्या कार्याच्या बळावर पुन्हा पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत होते. भाजपच्या खासदारांचे प्रगतीपुस्तक तयार करण्यात आले होते. यात त्यांची प्रगती चांगली असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु पक्षातर्गंत वादात त्यांची उमेदवारी कापली गेल्याचे सांगण्यात येत आहे. आपली उमेदवारी आपल्याच पक्षातील व मतदार संघातील आमदार मंगेश चव्हाण व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी कापली असल्याचा संशय पाटील यांना आहे, त्याबाबत त्यांनी जाहिरपणे सांगितलेही आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन थेट शिवसेना ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश केला व त्यांचे मित्र भाजपचे पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांनाही सोबत घेतले. विशेष म्हणजे या ठिकाणी पाटील यांनी चाणाक्ष खेळी केली.

त्यांनी स्वत: उमेदवारी न घेता त्यांचे मित्र करण पवार यांच्यासाठी उमेदवारी मागितली. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्यांनी खर्‍या अर्थाने आपली उमेदवारी कापणारे भाजपचे नेते गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. उन्मेश पाटील यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करून मित्र करण पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी केली.त्यांनी श्रीमती वाघ यांच्या निवडणूकीची जबाबदारी आपल्याकडे घेतली. त्यादृष्टीने त्यांनी रणनीतीही आखली. त्यामुळे खर्‍या अर्थाने निवडणूकीत उन्मेश पाटील विरूद्ध मंगेश चव्हाण असे चित्र उभे राहिले. दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोपही केले आहेत. चाळीसगाव तालुक्यात तर लोकसभेच्या दोन्ही उमेदवारापेक्षा उन्मेश पाटील विरूद्ध मंगेश चव्हाण अशीच लढत दिसत होती. मतदारांमध्येही त्याबाबतच चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणूकीत भाजपच्या स्मिता वाघ की शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार विजयी होणार याकडे जनतेचे लक्ष आहेच. परंतु चाळीसगाव तालुक्यातून कोणाला अधिक लीड मिळणार याकडे लक्ष आहे. भाजपच्या उमेदवाराला अधिक लीड मिळाल्यास आमदार मंगेश चव्हाण यांचे तर शिवसेना (उबाठा) पक्षाला उमेदवाराला अधिक लीड मिळाल्यास माजी खासदार उन्मेश पाटील यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. याच आधारावर चाळीसगाव तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरच चाळीसगाव विधानसभेचे रणांगण पेटण्यासही सुरूवात होणार आहे.

Exit mobile version