व्यवस्थापकासोबत ग्राहकांवर कामोठे पोलिसांनी केली कारवाई
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे वसाहतीमधील वेंकट प्रेसेंडन्सी या हॉटेलच्या टेरेसवर चालवण्यात येणाऱ्या हुक्का पार्लरमध्ये मित्रांसोबत बसलेल्या युवकांवर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे वृत्त ‘दैनिक कृषिवल’ने शनिवारी (दि.6) प्रसिद्ध केले होते. या हल्यात एक युवक गंभीर जखमी झाल्याचे सीसीटीव्हीद्वारे झालेले चित्रण दैनिक कृषिवलच्या हाती लागले होते.
कृषिवलच्या वृत्ताची दखल घेत कामोठे पोलिसांनी हल्ला झालेल्या हुक्का पार्लरवर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकला. यावेळी हुक्का पार्लरच्या मालकासहित व्यवस्थापक, वेटर आणि 3 ग्राहकांवर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान हुक्क्यासाठी लागणारे साहित्य, तसेच तंबाखू जन्यपदार्थ असा एकूण 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरचे वाढलेले प्रस्थ रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी प्रयत्न करावेत या करता दैनिक कृषिवल मार्फत कायम पाठपुरावा केला आहे. वसाहतीमधील हुक्का पार्लरवर घडलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांनी संबंधित पार्लरवर पोलिसांनी धाड टाकल्याने उशिराने जाग्या झालेल्या पोलिसांच्या कृती विरोधात संशय व्यक्त करण्यात येत आहे.