502 उमेदवारांची होणार लढत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज छाननीनंतर अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया मंगळवारी (दि. 27) सकाळी अकरा ते तीन या वेळेत पार पडली. जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समितीच्या जागांसाठी अंतिम 502 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या 173, तर पंचायत समितीच्या 329 उमेदवारांचा समावेश आहे. काही मतदार संघांमध्ये दुरंगी, तर काही मतदार संघामध्ये तिरंगी-चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, प्रचारासाठी उमेदवारांना चार फेब्रुवारीपर्यंत वेळ मिळणार आहे.
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ 16 ते 21 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून झाला. छाननी प्रक्रियेच्या 22 जानेवारीला 1,072 अर्ज वैध ठरविण्यात आले, त्यात जिल्हा परिषदेच्या 386 आणि पंचायत समितीच्या 686 अर्जांचा समावेश होता. मंगळवारी (दि. 27) झालेल्या अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील 502 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.
गावबैठकीनंतर आता प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने 23 जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी शेकापकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. शेकाप महाविकास आघाडीने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना सुशिक्षित उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. निवडणुकीत उच्च शिक्षित व सुसंस्कृत उमेदवार असावा, यासाठी हा प्रयत्न केला आहे. गावबैठकांसह प्रचारांमुळे जिल्ह्यात शेकाप महाविकास आघाडीला अधिक यश येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
कारभार संथगतीने
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासन कामाला लागले आहे. सर्व प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे, यासाठी प्रशासनाने कायमच प्रयत्न केला जात आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांसह इतर माहिती जिल्हा प्रशासाकडे वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा ढिला कारभार यातून समोर आला आहे. प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अंतिम उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. तालुक्यांकडून माहिती वेळेवर प्राप्त झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडूनदेखील याची माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यांचादेखील कारभार संथगतीने असल्याचे दिसून आले.
–—
अलिबागमध्ये 63 उमेदवार रिंगणात
अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीनंतर अलिबाग तालुक्यात जिल्हापरिषदेसह पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी अंतिम उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी 21 उमेदवार असून पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी 42 उमेदवार असे एकूण 63 उमेदवार रिंगणात आहेत.
वेगवेगळी होणार लढत
जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. काही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघात दोन उमेदवार तर काही मतदार संघात चार ते सहा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मतदार संघात पाचपेक्षा अधिक उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकमेकांविरोधात चुरशीची लढत होईल तर काही ठिकाणी एकतर्फी विजय होईल. तर काही ठिकाणी कोणाला कौल मतदार देणार हे मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
उमेदवारांवर दृष्टीक्षेप
तालुके - जि.प. - पंचायत समिती
अलिबाग - 21- 42
उरण - 14- 23
कर्जत - 18- 29
रोहा - 14- 25
म्हसळा - 08- 13
मुरूड - 05- 13
श्रीवर्धन -05- 15
पोलादपूर - 06- 08
पेण - 14- 29
सुधागड - 04- 11
खालापूर - 11- 17
पनवेल - 18- 46
माणगांव - 17- 26
तळा - 05- 09
महाड - 13- 23
एकूण - 173- 329
