पेण तालुक्यात यात्रोत्सवांना सुरुवात

दोन वर्षानंतर यात्रांना होणार मोठी गर्दी
। मळेघर । वार्ताहर ।
चैत्र पाडवा नंतर सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू होत असतो. महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी कारल्याच्या एकविरा देवीच्या यात्रा उत्सव झाल्यानंतर स्थानिक ग्रामदेवतांच्या यात्रांना सुरुवात होत असते. दोन वर्षानंतर पेण तालुक्यात यात्रा भरत असून वाशी, वढाव, बोरी, कळवा, रावे दादर यांच्या सह अनेक ठिकाणच्या यात्रांना मोठी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर यात्रांमध्ये पुन्हा तोच उत्साह पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने कोट्यावधींची उलाढाल होणार असल्याचे बोलले जात आहे. यात्रा म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना यात्रेचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुकता असते.
अविरतपणे सुरू असणार्‍या या यात्रांवर कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्ष यात्रांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षे यात्रा होऊ शकल्या नाहीत. या वर्षी कोरोना महामारी संपुष्टात आल्याने महाराष्ट्र शासनाने सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे यात्रा प्रेमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या ग्रामदेवतांच्या यात्रांसाठी छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना आर्थिक चालना मिळणार असल्याचे यांनाही चांगला आर्थिक लाभ होणार आहे.
पेण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वढाव वाशी, बोरी, रावे, दादर, गडब या यात्रांना मोठी गर्दी होणार आहे. त्याच बरोबर कोलेटी, पांडापुर, उंबर्डे, कळवा, जोहे मळेघर काळेश्री, वरेडी व अन्य ठिकाणच्या ग्रामदेवतांच्या उत्सवाला साजरा करण्यात येणार असून यासाठी त्या-त्या ठिकाणच्या ग्रामदेवतांच्या यात्रांसाठी जय्यत तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. यात्रांमध्ये देव काठी लक्ष वेधून घेत असतात उंचच उंच देव काट्या बनवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ पहायला मिळत असते. उन्हाळ्याची पर्वा न करता ग्रामस्थ देवकाठी मंदिराजवळ नेत असतात तसेच देव काट्या उभारताना एक वेगळाच आनंद नागरिकांमध्ये पाहावयास मिळत असतो.

Exit mobile version