पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे; भरदुपारी गोळीबार अन्‌‍ कोयत्याने हल्ला

मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.25) घडली. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर भरदुपारी एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यात कात्रज येथील मंदार किवळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, या जीवघेण्या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता आणि बुधवारी तो या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शिवाजीनगर कोर्टात हजर राहिला होता. सुनावणी आटोपून दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास तो शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 बाहेर येताच, दोन दुचाकीवरून आलेल्या 6 हल्लेखोरांनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी सुरुवातीला मंदारवर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, पिस्तुलातून गोळी मिस फायर झाल्याने हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि हातातील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. यावेळी हल्लेखोर कोयत्याने वार करत असताना, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मंदारने आपले दोन्ही हात डोक्याभोवती धरले होते. त्यामुळे कोयत्याचे सर्व वार त्याच्या दोन्ही हातांवर बसले आणि त्याला गंभीर दुखापत झाली. तसेचा त्याच्या डोक्याला मागच्या बाजूने फ्रॅक्चर झाले आहे. या हल्ल्यानंतर सर्व 6 आरोपी दुचाकीवरून फरार झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला स्थानिकांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. येल्लाप्पा जाधव यांनी मंदार किवळेच्या जखमांबाबत सविस्तर माहिती दिली. गोळीबारात एक गोळी मंदारच्या उजव्या हाताला आणि पाठीला चाटून गेली आहे. याशिवाय, कोयत्याच्या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांवर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे मंदार किवळे याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे पुढचे 72 तास अत्यंत महत्त्वाचे असून, तोपर्यंत त्याच्या प्रकृतीबाबत निश्चित असे काहीच सांगता येत नाही. त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. हा रक्तस्त्राव नेमका किती झाला आहे, हे तपासूनच त्याच्या पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

या जीवघेण्या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे समोर आले आहे. 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाण याने हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तिथून दोन पिस्तुलं जप्त केली आहेत.

Exit mobile version