पुन्हा कोरोना?

कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याच्या बातम्या चिंतेत टाकणार्‍या आहेत. चोवीस तासांमध्ये देशात सुमारे तीन हजारांना नवीन लागण झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी मुंबईत एका दिवशी 98 नवीन कोरोना-लागणीचे प्रकार समोर आले. मागच्या जवळपास दीड महिन्यांच्या काळातली ही सर्वात मोठी वाढ होती. राज्यामध्येही 31 मार्चपासूनची सर्वाधिक संख्या 162 नोंदवली गेली. दिल्लीमध्ये तर मंगळवारी एका दिवसात एक हजाराहून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या. त्यामुळे तिथे पुन्हा मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली असून न लावल्यास दंडही होणार आहे. कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांमध्ये तसंच उत्तर प्रदेशात लखनौ, नॉयडा इत्यादी शहरांमध्ये पुन्हा मास्क-सक्ती लागू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतो आहे याचा निदर्शक आर-व्हॅल्यूने दर्शवतात. गेल्या चार महिन्यांमध्ये प्रथमच हा संसर्ग निदर्शक एकच्या वर गेला आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरू या शहरांमध्ये तो एकहून अधिक आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये तर तो दोनहूनही अधिक आहे. म्हणजेच तिथला संसर्ग इतर ठिकाणांहून अधिक आहे. मात्र देशातील काम-धंदा-उद्योग करणार्‍या लोकसंख्येपैकी बहुतांशांनी आजतागायत लशीचे किमान दोन डोस घेऊन झाले आहेत. शिवाय ओमायक्रॉनची साथही पसरून गेली आहे. यामुळे लोकांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती तयार झाली असेल असा जाणकार डॉक्टरांचा अभिप्राय आहे. म्हणूनच तर आपले सर्व व्यवहार जवळपास पूर्वपदावर आले आहेत. सध्या संसर्ग वाढत असला तरी मुलांमध्ये त्याचा प्रसार लक्षणीय प्रमाणात झालेला नाही ही आशादायक बाब आहे. त्यामुळेच मुलांच्या शाळा बंद करू नयेत यावर देशातील सर्वांचे तूर्तास तरी एकमत आहे व ते योग्यच आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. चीनमध्ये शांघाय या त्यांच्या आर्थिक व औद्योगिक राजधानीमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार उडवून दिला आहे. शांघायची लोकसंख्या अडीच कोटी आहे. म्हणजे मुंबई आणि पुण्याला एकत्र केले तर जितके मोठे होईल तसे हे शहर आहे. शांघाय नगरीशी आपले व जगाचे व्यापारी संबंध असल्याने सर्वांनाच संसर्गाचा धोका आहे. या शहरातील लोकांना सरकारने घरांमध्ये अक्षरशः नजरकैदेत टाकले आहे. अशा वेळी आपल्याला आपले सरकार हे चिनी सरकारपेक्षा बरेच दयाळू आहे असे वाटू लागेल. पण चिनी सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी कितीतरी अधिक दर्जेदार सुविधा देशभर उभारल्या आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. याउलट आपल्याकडे आधी कोरोना संपला असे राजकारण्यांनी घोषित केले. मग दुसरी लाट आली. त्यात ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांचे बळी गेले. पण सर्वपक्षीय सरकारे एकसारखीच निर्ल्लज्ज असल्याने असे बळी गेले हे मान्य करण्याची एकाचीही तयारी नाही. केंद्राने याबाबत आकडेवारी मागितली असता आजतागायत ऑक्सिजनअभावी आपल्या राज्यात एकही बळी गेलेला नाही असा अत्यंत बाणेदार जबाब सर्व राज्य सरकारांनी दिला आहे. आता कोरोनाचे गांभीर्य कमी झाल्याने या उत्तराची विशेष चर्चा मिडियामध्ये झाली नाही. पण ती व्हायला हवी. योगी आदित्यनाथांपासून ते उद्धव आणि ममतांपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला जायला हवा. यामुळे गेलेले लोक परत येणार नसले तरी या नेत्यांचे उत्तरदायित्व संपत नाही. त्यांचे माप त्यांच्या पदरात टाकले पाहिजे. मोदी सरकारने एकूण बळींचे आकडेही लपवल्याचा आरोप होतो आहे. पाच लाख नव्हे तर देशात चाळीस लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले होते. जागतिक आरोग्य संघटनेला खरी माहिती प्रसिद्ध करण्याला आपण आडकाठी करीत असल्याचा आरोपही त्यात करण्यात आला होता. त्याची देखील निःपक्ष छाननी होऊन जनतेच्या समोर खरे चित्र यायला हवे. कोरोनाची एखादी लाट पुन्हा आलीच तर काय काळजी घ्यायला हवी हे त्यातूनच कळेल. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना-स्थितीबाबत चर्चा केली. केंद्राने आपली जबाबदारी ओळखून राज्यांसोबत योग्य समन्वय ठेवला तर संभाव्य उद्रेकावर मात करता येईल.

Exit mobile version