लोकार्पणाचा पुन्हा घाट; नागरिकांमध्ये चर्चांना ऊत

| श्रीवर्धन | वार्ताहर |

नगरपरिषदेने बांधलेल्या काही विकास कामांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनमध्ये करण्यात आले होते. त्यातील काही अपूर्ण असलेली कामे आता पूर्ण झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी पुन्हा लोकार्पण केल्याने जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहेत.

जलशुद्धीकरण प्रकल्प व शहरातील जलवाहिन्या बदलण्याच्या कामाचे लोकार्पण, तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावरील सुशोभीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर श्रीवर्धन येथील र.ना. राऊत विद्यालयाच्या पटांगणामध्ये अजित पवार यांची प्रचंड अशी सभा देखील झाली होती.

सदर कार्यक्रमासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती कोळंबी, खेकडा तसेच होडी व मच्छीमार यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत. आजच्या या कार्यक्रमात कोळंबीच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच होडी व मच्छीमार यांच्या प्रतिकृतीचे देखील लोकार्पण करण्यात आले. तसेच श्रीवर्धन समुद्रकिनारी एका स्वच्छतागृहाचे भूमिपूजन देखील त्यांनी केले.

Exit mobile version