बेवारस होणार आत्मनिर्भर; व्होकल फॉर लोकल उपक्रमांतर्गत व्यवसाय प्रशिक्षण

जेएनपीटी व जन शिक्षण संस्थानचा पुढाकार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा पनवेल तालुका येथील बेवारस, भिकारी बांधवांसाठी असलेल्या सेल आश्रम, वांगणी-पनवेल येथे हस्तनिर्मित बांबू सीएसआर जेएनपीटी मुंबई व जन शिक्षण संस्थान रायगड यांनी विशेष पुढाकार घेत अगरबत्ती व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड तर्फे व्होकल फॉर लोकल आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील सेल आश्रम वांगणी गाव येथे बेवारस, भिकारी बांधवांसाठी अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण सीएसआर जेएनपीटी-मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून अगरबत्ती बनवण्याचे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे.

सेल आश्रम वांगणी पनवेल या ठिकाणी राज्यभरातील सोडून दिलेले बेवारस लोक, भिकारी असे लोक ज्यांना कोणतीही ओळख नाही अशा लोकांना माणुसकीच्या भावनेतून सेल आश्रमात आणले जाते, त्यांच्यावर औषधोपचार करून, त्यांची भोजन, राहण्या-खाण्याची व शिक्षणाची व्यवस्था केली जाते, तसेच प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून त्यांना नावसुद्धा दिले जाते. अशा बेवारस व बेरोजगार बांधवांसाठी सीएसआर जेएनपीटी मुंबई व जन शिक्षण संस्थान रायगड यांनी विशेष पुढाकार घेऊन व्होकल फॉर लोकल आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत सेल आश्रम वांगणी पनवेल येथे अगरबत्ती व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यावेळी विजय कोकणे, मुख्य प्रशिक्षक भारतभूषण पाटील व गायत्री पाटील, सेल आश्रमाच्या वतीने प्रा. बिजू सॅम्युअल (असोसिएट डायरेक्टर), जन शिक्षण संस्थान रायगडच्या कर्मचारी व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर क्षेत्र भेट कार्यक्रम कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.

60 दिवसांची कार्यशाळा
भविष्यात हे बांधव अगरबत्ती उद्योगातून आत्मनिर्भर बनून त्यांना स्वतःचा अगरबत्ती उद्योग सुरू करण्यास मदत करण्यात येणार आहे. सदर 60 दिवसांच्या कार्यशाळेमध्ये अगरबत्ती साहित्य संकलन, बनविण्याची प्रक्रियेपासून ते पॅकिंग आदींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीचे योग्यरित्या विपणन व विक्री करण्यासाठी सामाजिक संस्था व इतर ठिकाणी मदत केली जाणार आहे.

Exit mobile version