किरीट सोमय्या ईडीचा एजंट – खा. संजय राऊत

| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न सुरु असून, त्यात यश येत नसल्यामुळे ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठीमागे हेतुतः लावला जात आहे. राज्यातील भाजपचे काही नेतेच ईडीचे दलाल म्हणून काम करीत असून, किरीट सोमय्या यांचे पीएमसी बँक घोटाळ्याचा सूत्रधार राकेश वाधवान याच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कटकारस्थाने करणार्‍या भाजप नेत्यांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यासह अन्य भाजप नेत्यांवरही कडाडून शेलक्या भाषेत टीका केली. किरीट सोमय्या हा ईडीचा दलाल म्हणूनच काम करीत असून, त्याचे असणारे आर्थिक लागेबंध तपासले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

कोर्लईचे बंगले दाखवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराचे रायगड जिल्हह्यात कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा आरोप सोमय्या वारंवार करीत आहेत. ते बंगले कुठे आहेत, याचा तपास आपण सर्वांनीच करुया, त्यासाठी तेथे सहल काढून शोध घेऊया, असा हल्लाही राऊत यांनी केला.

बँक घोटाळ्यातून कंपनी
सोमय्या याचे पीएमसी बँक घोटाळ्याचा सूत्रधार राकेश वाधवान याच्याशी आर्थिक संबंध असून, या बँकेच्या घोटाळ्यातील पैसे सोमय्या याने आपल्या फायद्यासाठी वापरले आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रकचर कंपनी किरीट सोमय्यांची आहे. त्यांचा मुलगा नील कंपनीचा संचालक आहे. निकॉन कंपनीसाठी पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा वापरला असून, वसईमध्ये गोखीवरे तालुक्यात हजारो कोटींचा प्रकल्प उभा केला आहेफ असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Exit mobile version