रिफायनरी प्रकल्पग्रस्त आक्रमक
| राजापूर | प्रतिनिधी |
राजापूर परिसरातील होणार्या बारसू-सोलगाव रिफायनरीला स्थानिकांनी सलग दुसर्या दिवशीही तीव्र विरोध केला. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला होता. यावरुन आता राजकीय वातावरणही तापले आहे.सत्ताधारी आणि विरोधकांवर परस्परांकडून आरोपांच्या फै़र्या झाडल्या जात आहेत.
रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येने बारसू गावात आले होते. मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा म्हणून सांगितले. मात्र, ते न ऐकल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या आंदोलनावरुन राज्यातील विरोधी पक्षांचे नेते आता कमालीचे संतापल आहेत.सरकारने बळजबरीने हे सर्वेक्षण न करता तातडीने ते थांबवावे, अशी मागणी प्रमुख राजकीय पक्षांच्या विरोधकांनी केली आहे.रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. नवी मुंबईतील खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस बळाचा वापर कराल तर बारसू प्रकरण आपणास महागात पडेल, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्थानिकांचा विरोध असताना बारसू प्रकल्प आणण्याचा कशासाठी घाट घातला जात आहे. यात कोणाचा स्वार्थ आहे. कोणासाठी हा प्रकल्प आणला जात आहे, असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केलेत.
ठाकरेंवर फडणवीसांचा आरोप
बंगळुरू, महाराष्ट्रातल्या बारसू या ठिकाणी जो प्रकल्प आणायचा आहे आणि त्यावर जो विरोध होतो आहे त्यावरही भाष्य केलं आहे. कुणाची सुपारी घेऊन बारसूला विरोध करत आहात ते तरी सांगा? असा प्रश्न उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकालही आमच्याच बाजूने लागेल आणि 2024 मधील विधानसभा निवडणूकही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवू, असेही त्यांनी सुचित केले.
कर्नाटकातील प्रचारसभामध्ये बोलताना फडणवीस यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले. ही जी रिफायनरी आहे त्यात केंद्र सरकारच्या तीन कंपन्या एकत्रित येऊन देशाच्या इतिहासतली सर्वात मोठी गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीमुळे एक लाख लोकांना रोजगार कोकणात मिळणार आहेत अले त्यानी स्पष्ट केले. मागच्या काळात नाणारलाही ही रिफायनरी करायचं ठरवलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर त्यांच्याही हे लक्षात आलं उशिरा आलं पण आलं. त्यामुळे बारसूला रिफायनरी करा असं पत्र उद्धव ठाकरेंनी पाठवलं आता पुन्हा तेच विरोध करत असल्याचेही फडणवीस यांनी निदर्शनास आणले.