अलिशान कारमधून शहरामध्ये फेरफटका
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आघोरीबाबांचा वावर वाढला आहे. अलिबाग शहरातील वेगवेगळ्या भागात ही मंडळी अलिशान कारमधून फिरत आहे. ही मंडळी उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती असून कोळीवाड्यातील एका उमेदवारांनादेखील भेटल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
अलिबाग शहरामध्ये यापूर्वी कधी आघोरीबाबांचा वावर दिसून आला नाही. मात्र अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे. त्या पध्दतीने गेल्या दोन दिवसांपासून अलिबाग शहरात उत्तर प्रदेश राज्यातील आघोरी बाबांचा वावर वाढला आहे. दोन मोठ्या अलिशान गाडीतून ही मंडळी शहरामध्ये ठिकठिकाणी फेरफटका मारीत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातून ही मंडळी अलिबागमध्ये आल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उत आला आहे. यातील काही आघोरी बाबा कोळीवाड्यातील एका उमेदवारालादेखील भेटण्यास गेल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तो उमेदवार कोण असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. निवडणूकीत जिंकण्यासाठी असे अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात अलिबाग पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणूकीच्या कालावधीत काही गैर प्रकार घडू नये, म्हणून अलिबाग शहराच्या सिमारेषेवर तीन स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे काम केले जात आहे. मात्र उत्तरप्रदेश राज्यातून ऐन निवडणूकीच्या कालावधीत येणाऱ्या या आघोरी बाबांच्या गाडीकडे दुर्लक्ष का, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
शहराच्या प्रवेशद्वारासमोर तीन स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले आहे. ऐन निवडणूकीच्या कालावधीत हे उत्तरप्रदेश राज्यातून आघोरी बाबा शहरात दाखल झाले असल्यास त्यांची तपासणी करण्याची सुचना पथकाला देऊन माहिती घेण्यास सांगितले जाईल.
– सागर साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग







