महापालिका परिवहन कर्मचार्‍यांचे आंदोलन

हाताला काळ्या फिती लावून कामाला सुरुवात

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून वारंवार लेखी पाठपुरावा करुन, शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालिका आयुक्तांसह परिवहन व्यवस्थापकांच्या सतत भेटी घेऊनही समस्या सुटतच नसल्याने परिवहन विभागातील रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि.23) सकाळपासून काळ्या फिती लावून कामाला सुरुवात केली आहे.

कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या परिवहन विभागात काम करणार्‍या रोजंदारी तसेच ठोक मानधनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या समस्यांचे निवारण करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून मागणी केली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सोमवारी काळ्या फिती लावून काम करणार व त्यानंतर कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये रोजंदारी तसेच ठोक मानधनावर वाहक आणि चालक कार्यरत आहेत. प्रशासनामध्ये आज ना उद्या आपली सेवा कायम होईल या आशेवर हे कर्मचारी गेली 15 ते 16 वर्षे इमानेइतबारे काम करत आहेत. या कर्मचार्‍यांची सेवा तर कायम झाली नाहीच, पण त्यांना पगारवाढही प्रशासनाने दिलेली नाही. त्यांच्या समस्यांचे निवारण होत नाही, त्यांना माफक प्रमाणावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासही प्रशासनाने आजवर टाळाटाळच केली आहे. जे प्रशासनाच्या प्रवासी सेवेचा डोलारा सांभाळतात, त्यांच्यासाठी तरतूद करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे आणि प्रशासन या जबाबदा रीपासून आपले अंग झटकू शकत नाही. स्वमालकीचे धरण व राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणना होणार्‍या नवी मुंबई महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब नाही. परिवहन कर्मचार्‍यांच्या मागण्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत सातत्याने महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे लेखी पाठपुरावा करत आहेत.

Exit mobile version