निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचे उपोषण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी शुक्रवारी (दि.24) आपल्या प्रदीर्घ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परिमंडळ कार्यालयासमोर एकदिवसीय अर्धनग्न अवस्थेत उपोषण केले.

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या कृती समितीने आपल्या प्रदीर्घ असलेल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा लेखी स्वरूपात शासनास व संबंधित अधिकार्‍यांस दिला होता. तथापि, त्यांना संबंधित अधीक्षक अभियंता यांनी कोणत्याही प्रकारे चर्चेचे निमंत्रण न दिल्याने ठरल्याप्रमाणे अर्धनग्न अवस्थेत सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हे उपोषण करण्यात आले. या उपोषणात कृती समितीचे सचिव शिवाजी देशमुख, अंकुश पाटील, पी. एम. पाटील, शरद कोरडे, पाटील, शांताराम मेकडे, सुरेश खोत, अरुण पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्यातील 60 निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा सहभाग होता. तसेच मृत्यू पावलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या विधवा पत्नीही सहभागी झाल्या होत्या.

हे उपोषण प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाच्या पदावर आल्यापासून त्या पदाची वेतनश्रेणी लागू करणे, त्यानुसार कालबद्ध पदोन्नती देऊन पुढील वरिष्ठ वेतनश्रेणी देणे व बारा वर्षांनी आश्‍वासित योजना प्रगती योजनेनुसार लाभ देणे या मागण्यांसाठी होते. या मागण्या शासकीय नियमानुसार अनुज्ञ आहेत. शासकीय बांधकाम खात्याने व वित्त विभागाने प्रत्येक वेळी तसे आदेश व परिपत्रके काढली आहेत. परंतु, त्याची पूर्तता न केली गेल्यामुळे आपल्या या मागण्यांसाठी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकांची संघटना अनेक वर्षे करीत आहे. प्रत्येक वेळी चर्चेच्या वेळी संबंधित अधिकारी या मागण्यांबाबत सहमती दर्शवितात, पण प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. शासनाने याबाबतीत संबंधित परिमंडळास आदेश देऊनही अधीक्षक अभियंता पुढील कार्यवाही करीत नसल्यामुळे कृती समितीचे सचिव शिवाजी देशमुख यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्याने या मागण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करते केली तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकांच्या या उपोषण प्रसंगी पोलिसांनी अधिकार्यांनी उपोषण करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना मोलाचे सहाय्य केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर तेथील संबंधित कनिष्ठ अधिकार्‍यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेऊन ती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. दुपारी कोकण भवन येथील अधीक्षक अभियंता गायकवाड यांनी निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी नेत्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक अहवाल तयार करून तो मुंबई येथील परिमंडळ कार्यालयात पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

Exit mobile version